गुजरातला गेले महाराष्ट्र सरकारचे मंत्री उदय सामंत आणि सुधीर मुनगंटीवार, जाणून घ्या तेथे काय शिकणार?


मुंबई : गुजरातच्या मुख्यमंत्री डॅशबोर्ड सिस्टीमची सध्या बरीच चर्चा आहे. ही प्रणाली ई-गव्हर्नन्स आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल सांगते. त्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ गुजरातला गेले आहे. या शिष्टमंडळात महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ सोमवारी गुजरातला रवाना झाले होते. यामध्ये सहभागी असलेले लोक गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही भेट घेणार आहेत.

कोण कोण गेले आहेत गुजरातला
या शिष्टमंडळात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि वने, संस्कृती आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश असल्याचे महाराष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे शिष्टमंडळ डॅशबोर्ड प्रणालीचा अभ्यास करेल, जेणेकरून महाराष्ट्रातही अशी व्यवस्था करता येईल. त्याचा उद्देश गुंतवणूकदार आणि उद्योगांना आकर्षित करणे हा आहे. वेदांता आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन यांच्यात गुजरातमध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाचा कारखाना सुरू करण्यासाठी करार झाला असतानाच महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने गुजरातला भेट दिली आहे. यापूर्वी हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार होता. यावरून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण होते.

मुख्यमंत्री डॅशबोर्ड 2019 मध्ये गुजरातमध्ये विकसित करण्यात आला. याद्वारे मुख्यमंत्री ई-गव्हर्नन्स अॅपचा डेटा एकाच ठिकाणी पाहू शकतात. याच्या मदतीने कुठे चांगले काम होत आहे हे देखील कळू शकते. यामध्ये सरकारच्या 20 हून अधिक क्षेत्रांतील तीन हजारांहून अधिक इंडिकेटर्सचा डेटा दररोज मिळतो. हा डेटा नंतर एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित केला जातो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचना
महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि काही आयएएस अधिकाऱ्यांना गुजरातला जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुजरातने राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा अभ्यास करण्यास सांगितले होते. या योजना राज्यात राबविण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, गुजरात, गोवा आणि हिमाचल प्रदेशला भेट देण्यासाठी तीन शिष्टमंडळे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक शिष्टमंडळात दोन मंत्री आणि काही आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेणार आहे.