बुरखा घालण्यास नकार दिल्याने इक्बालने कापला रुपालीचा गळा, तीन वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह


मुंबई – बुरखा आणि हिजाबबाबत अनेक देशांमध्ये वाढता गदारोळ सुरू असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इकबाल महमूद शेख नावाच्या व्यक्तीने पत्नी रुपालीचा गळा चिरून खून केला, कारण ती मुस्लिम प्रथा पाळत नव्हती आणि बुरखा घाल नव्हती. रुपालीने इक्बालसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता, मात्र ती इक्बालच्या बळजबरीला कंटाळून घटस्फोटाची मागणी करत होती. घटस्फोटापूर्वीच आरोपीने तिची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी इकबाल शेख याने पत्नी रुपाली हिला चाकू खूपसुन ठार केले. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

तीन वर्षांपूर्वी झाले होते मुस्लिम तरुणाशी लग्न
रुपालीचे तीन वर्षांपूर्वी इक्बाल शेखसोबत प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघेही चेंबूर परिसरात असलेल्या इक्बालच्या घरी राहत होते. रुपाली हिंदू असल्याने आणि लग्नानंतरही ती मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने स्वत: इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. इक्बालचे कुटुंब रुपालीवर बुरखा घालण्यासाठी दबाव आणत होते, पण तिला ते मान्य नव्हते. यावरून सारखा वाद होत होता. यानंतर रुपाली आणि इक्बाल वेगळे राहू लागले. या जोडप्याला एक मुलगाही आहे.

सहा महिने वेगळे असूनही दोघे फोनवर बोलायचे. मात्र, यावेळीही इक्बाल त्याच्यावर मुस्लिम परंपरा पाळण्यासाठी दबाव आणत असे. रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीला मूलबाळ नसल्याने त्याने तिला घटस्फोट दिला होता.

भेटायला बोलावून भररस्त्यात केले वार
आरोपी इकबाल शेख याने रुपालीला सोमवारी सायंकाळी चेंबूर परिसरातील पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले. यादरम्यान बुरखा आणि इतर गोष्टींवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावर रुपालीने घटस्फोटाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. हाणामारी आणि वाद वाढत गेल्याने इक्बालने खिशातून चाकू काढून रुपालीच्या गळ्यावर वार करून पळ काढला. रुपालीचा जागीच मृत्यू झाला. उपस्थितांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.