Indians in Canada : कॅनडात भारतीयांविरुद्ध वाढत आहेत द्वेषाचे गुन्हे, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कॅनडात भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. नुकतेच एका भारतीय विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार केल्याची घटनाही समोर आली आहे. दरम्यान, कॅनडामध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी आणि इतर भारतीय नागरिकांबाबत भारत सरकारकडून एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. त्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, कॅनडामध्ये द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा स्थितीत कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी या संदर्भात कॅनडा सरकारशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, भारतीय नागरिक आणि कॅनडामध्ये राहणारे विद्यार्थी, जे कॅनडामध्ये प्रवास करणार आहेत, त्यांनी सावधगिरी बाळगावी. याशिवाय भारतीय नागरिकांना madad.gov.in वर नोंदणी करण्यास सांगितले आहे.

या गोळीबारात लागली भारतीय विद्यार्थ्याला गोळी
कॅनडातील ओंटारियो येथे गोळीबारात जखमी झालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी दोन जणांना जीव गमवावा लागला. गेल्या सोमवारी गोळीबार झाला. यामध्ये एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला होता. सतविंदर सिंग असे त्याचे नाव आहे. हॅमिल्टन शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.