IPL 2023 : जुन्या फॉर्मेटमध्ये परतणार आयपीएल, संघांना खेळता येणार घरच्या मैदानावर; महिलांचे आयपीएलही पुढील वर्षीपासून होणार सुरू


IPL 2023 पुन्हा एकदा जुन्या फॉर्मेटमध्ये परतणार आहे. म्हणजेच आता पूर्वीप्रमाणेच संघ निम्मे सामने आपापल्या घरच्या मैदानावर आणि अर्धे सामने इतर संघांच्या घरच्या मैदानावर खेळताना दिसतील. यासोबतच महिला आयपीएलही पुढील वर्षीपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य घटकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये दिलेली ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गांगुलीने मंगळवारी राज्य संघटनेंना एक ईमेल केला. यानुसार, कोविड-19 मुळे गेल्या तीन हंगामात मर्यादित ठिकाणी खेळवले जाणारे आयपीएल आता पूर्वीप्रमाणेच होम आणि अवे ग्राउंडच्या आधारावर खेळवले जाणार आहे. गांगुलीने लिहिले आहे की, पुढील सीझनपासून आयपीएलमध्ये होम-अवे फॉरमॅटमध्ये सामने खेळवले जातील. सर्व 10 संघ आपापल्या मैदानावर सामने खेळतील.

पुढील वर्षापासून सुरू होणार महिला आयपीएल
सौरव गांगुलीने लिहिले आहे की, बीसीसीआय सध्या महिलांच्या आयपीएलवर काम करत आहे. त्याचा पहिला सीझन पुढच्या वर्षी लवकर सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे. अधिक तपशील येत्या काळात स्पष्ट होईल.

15 वर्षांखालील मुलींसाठी स्पर्धा
सौरव गांगुलीने ईमेलमध्ये लिहिले की, मला हे कळवताना अतिशय आनंद होत आहे की, आम्ही या हंगामापासून अंडर-15 मुलींची स्पर्धाही सुरू करणार आहोत. महिला क्रिकेट जगभर चांगली प्रगती करत आहे आणि आपला राष्ट्रीय संघही चांगली कामगिरी करत आहे. ही नवीन स्पर्धा मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करेल.