रॉजर फेडररचा निरोपाचा सामना दुहेरी, नदाल असेल जोडीदार

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू ४१ वर्षीय रॉजर फेडररने गेल्या आठवड्यात टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली असून सोशल मिडीयावर त्याने शेवटचा सामना लेव्हीस कप मध्ये खेळणार असल्याचे जाहीर केले होते. ही स्पर्धा शुक्रवार पासून सुरु होत असून त्यात रॉजरचा शेवटचा सामना दुहेरी मधील असेल आणि त्याचा जोडीदार फ्रांसचा राफेल नदाल असेल असे समजते. त्यात टीम युरोप आणि टीम वर्ल्ड एकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेचा हा पाचवा सिझन आहे.

रॉजर स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मिडियासमोर आला आणि त्याने निवृत्तीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी तो अतिशय चांगल्या मूड मध्ये होता. २० ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजरने त्याचा निरोपाचा सामना एकाद्या उत्सवाप्रमाणे असावा, पार्टी सारखे वातावरण असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. निवृत्ती पूर्वीची शांतता अनुभवतो आहे असेही तो म्हणाला. राफेल त्याचा अनेकदा कडवा प्रतिस्पर्धी राहिला आहे मात्र शेवटचा सामना तो रॉजरचा जोडीदार म्हणून खेळणार आहे. या स्पर्धेत जोकोविच, अँडी मरे हेही खेळाडू सामील आहेत.

२००५ मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची पहिली भेट फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या वेळी झाली होती. त्यानंतर ते अनेकदा एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून खेळले आहेत. रॉजर गेले अनेक दिवस गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. शेवटचा सामना खेळताना थोडा नर्व्हस असल्याचे सांगून तो म्हणाला, गेले अनेक दिवस टेनिस पासून दूर राहिल्याने अशी भावना आहे. पण हा सामना खेळून मला खुशीचा अनुभव घ्यायचा आहे.