तिरुपती बालाजीला दरवर्षी व्याजरुपात मिळते १०० किलो सोने

देशातील श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती बालाजी नेहमीच श्रीमंती बाबत चर्चेचा विषय राहिले आहे. बडे उद्योजक मुकेश अंबानी यांनी या ट्रस्टला नुकतेच मोठे दान दिले असल्याचे तसेच एका मुस्लीम जोडप्याने या ट्रस्टला १०० कोटींचे दान दिल्याच्या बातम्या नुकत्याच येऊन गेल्या आहेत. भगवान वेंकटेश्वराचे हे स्वयंभू स्थान असून वेंकटेश्वर हा विष्णूचा अवतार मानला जातो.

सध्या या ट्रस्ट कडे १० हजार किलो सोने, १२ हजार कोटींच्या मुदत ठेवी आणि ११०० पेक्षा जास्त अचल संपत्ती अशी मालमत्ता असल्याचे समजते. द्रविड शैलीत बांधल्या गेलेल्या या मंदिराला दररोज सरासरी ५० हजार ते १ लाख भाविक भेट देतात आणि विशेष उत्सव काळात ही संख्या ४ ते ५ लाखांवर जाते. २०२० मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार ट्रस्ट कडे ९ हजार किलो शुद्ध सोने जमा होते. त्यात गेल्या दोन वर्षात आणखी भर पडली आहे.

ट्रस्टने ७२३५ किलो सोने दोन बँकांमध्ये ठेवले असून त्याच्या व्याजापोटी दरवर्षी १०० किलो सोने ट्रस्टला मिळते. शिवाय ट्रस्टच्या खजिन्यात १९३४ किलो सोने असून ५५३ किलोंचे छोटे दागिने आहेत. ट्रस्टच्या मालकीच्या देशभरात ८,०८८,८९ एकर जमिनी असून या सर्व दान स्वरुपात मिळालेल्या आहेत. त्यातील २०८५.४१ एकर शेत जमीन असून ६००३.४८ एकर जमिनी बिगर शेती आहेत. दरवर्षी हुंडी मधून ट्रस्टला १ हजार ते १२०० कोटींची रोख रक्कम मिळते. देवस्थानचे महिन्याचे उत्पन्न २०० ते २२० कोटी आहे.

या ट्रस्टचे संचालन ८१ सदस्यांचे जम्बो बोर्ड करते. विशेष म्हणजे देशाच्या केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधानांसह ७८ सदस्य आहेत. म्हणजे देशाच्या मंत्रीमंडळा पेक्षाही देवस्थानचे बोर्ड अधिक मोठे आहे. या देवस्थानाला भाविकांनी दान केलेल्या केसांमधून सुद्धा कोट्यावाढीचे उत्पन्न दरवर्षी मिळते.