मुंबईत दिल्ली पोलिसांना मोठे यश, कंटेनरमधून जप्त केले 1725 कोटींचे ड्रग्ज


मुंबई: दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून (जेएनपीटी) कंटेनरमध्ये पॅक केलेल्या हेरॉइनची मोठी खेप जप्त केली आहे. या 345 किलो हेरॉईनची किंमत 1725 कोटी रुपये आहे. 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरातून अटक करण्यात आलेल्या दोन अफगाण नागरिकांकडून ही माहिती मिळाली होती.

स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, हेरॉईनची ही खेप 21 जून 2021 पासून मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये होती. याबाबत कोणत्याही एजन्सीला याची माहिती नव्हती. हा कंटेनर गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी मुंबईतून जप्त करण्यात आला. त्यानंतर तो दिल्लीत आणण्यात आला.

पाकिस्तान-अफगाणिस्तान कनेक्शन
विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दावा केला की, ही खेप भारतात पाठवणारी व्यक्ती पाकिस्तानमध्ये राहणारी मूळ अफगाणिस्तानची नागरिक आहे. या हेरॉईनमागे अफगाण कंपनीचा हात असून, त्यांनी ही खेप दुबईमार्गे पाठवली होती.

वेगवेगळ्या भागात जाणार होती ड्रग्जची खेप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ भारताच्या विविध भागात पुरवले जाणार होते. 6 सप्टेंबर रोजी, स्पेशल सेलने दिल्लीतून अटक केलेल्या दोन अफगाण नागरिकांच्या सांगण्यावरून चेन्नई बंदरातून भारतात आणलेले 312 किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्स देखील जप्त केले. आरोपी अफगाण नागरिक मुस्तफा आणि रहीमुल्ला यांनी पोलिसांना या मालाचा क्लूही दिला होता.

वेगवेगळ्या बंदरावरुन आणले जात आहे ड्रग्ज
पोलिसांचे म्हणणे आहे की, अंमली पदार्थांच्या दहशतीमध्ये गुंतलेले तस्कर भारतामध्ये अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी देशातील विविध बंदरांचा वापर करत आहेत.