गेल्या ७५ वर्षात ट्रंककॉल ते फाईव्ह जी, अशी झाली प्रगती

भारत यंदा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहे. त्यात गेल्या ७५ वर्षात अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले. टेलिकॉम किंवा दूरसंचार क्षेत्र हे त्यातील एक आहे. या काळात ऑपरेटरच्या सहाय्याने होणारे ट्रंक कॉल ते फाईव्ह जी असा हा वेगवान प्रवास विशेष महत्वाचा ठरला आहे. स्वातंत्र मिळाले तेव्हा देशात फक्त ८२ हजार टेलिफोन होते आणि आज ही संख्या ११७ कोटींवर गेली आहे. त्या काळी ४२६८ नागरिकांच्या मागे एक फोन होता आणि आज घरटी सरासरी चार मोबाईल फोन आहेत. तेव्हा प्रती मिनिट कॉल दर २४ रुपये होता आज कॉल मोफत आहेत. फक्त डेटा साठी पैसे भरावे लागतात. आणि त्यातही विशेष म्हणजे भारतात इंटरनेट सेवा अन्य देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त उपलब्ध आहे.

आज घडीला भारतात ११७ कोटी फोन आणि ६९.२ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. चीन नंतर भारत या बाबतीत दोन नंबरवर आहे. इंटरनेट व मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार २०२५ पर्यंत भारतात ९० कोटी इंटरनेट युजर्स असतील. थेट परकीय गुंतवणुकीत टेलिकॉम क्षेत्र तीन नंबरवर आहे. एफडीआयच्या प्रत्येक १०० रुपये गुंतवणुकीतील ७ रुपये या क्षेत्रातून येतात. या क्षेत्रात एकूण ४० लाख रोजगार आहेत. पैकी २२ लाखांना प्रत्यक्ष तर १८ लाख अप्रत्यक्ष रोजगार आहेत.

टेलिफोनची प्रत्यक्ष सुरवात भारतात २८ जानेवारी १८८२ मध्ये झाली. त्यावेळी ९३ ग्राहक होते. इंग्लंडच्या ओरीएंटल टेलिफोन कंपनीने कोलकाता, मुंबई, चेन्नई येथे एकस्चेंज सुरु केली होती. पण त्याचा वापर प्रामुख्याने सरकारी कामासाठी होत असे. पहिला मोबाईल देशात जुलै १९९५ मध्ये सुरु झाला. तेव्हा तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांनी दिल्ली तून कोलकाता येथे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना फोन केला होता. याच वेळी एसएमएस सेवा सुरु झाली.

डिसेंबर २००८ मध्ये देशात थ्री जी सेवा सुरु झाली आणि एमएमएस सेवा सुरु झाली. एप्रिल २०१२ मध्ये फोर जी आणि व्हिडीओ कॉल सुविधा सुरु झाली. जुलै २०२२ मध्ये फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलाव झाले आणि आता हे सेवा दिवाळीपासून सुरु होत आहे.