भारताचा प्रस्ताव मान्य- २०२३ ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’ म्हणून साजरे होणार

आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून २०२३ साल जगभर साजरे केले जाणार आहे. या संदर्भातला प्रस्ताव भारताने २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्राकडे पाठविला होता. स्मार्टफूड म्हणजे परिपूर्ण धान्य म्हणून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची योग्यता जगभरात मान्य केली गेली आहे. जगभरात सर्वाधिक बाजरी उत्पादन भारतात होते आणि त्यातील ८५ टक्के वाटा एकट्या राजस्थानचा आहे. भारतात बाजरी सर्वत्र वापरली जाते आणि ती विविध नावाने ओळखली जाते. इसवी सन पूर्व १५०० पासून भारतात बाजरी पिकविली जाते. कन्नड भाषेत सज्जे, तमिळ मध्ये कंबू, इंग्रजी मध्ये पर्ल मिलेट, महाराष्ट्र आणि राजस्थानात बाजरी अश्या नावाने हे धान्य ओळखले जाते.

इसवीसन पूर्व ३२२-१८५ मध्ये मौर्य राजवंशाचा दबदबा होता, त्या काळात बाजरी सेवन नियमाने होत असे शिवाय त्यापासून मद्य बनविले जात असे. बाजरी साठी कोरडी हवा आणि कोरडी जमीन जास्त उपयुक्त आहे. बाजरीपासून अनेक पदार्थ बनविले जातात, मात्र भाकरी आणि खिचडा अधिक प्रमाणात खाल्ले जातात. बाजरी हे कमी कॅलरी देणारे पण पौष्टिक अन्न असून त्याच्या सेवनातून आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्स योग्य प्रमाणात मिळतात. अशीच पोषण मूल्य ज्वारी आणि नाचणी मध्ये आहेत. यात ग्लुटेन नाही. शिवाय बाजरी शरीरातील मेद शोषून घेणारी आहे त्यामुळे वजन कमी होते. बी ६, झिंक, फ्लोराईड बाजरी मध्ये मुबलक प्रमाणात आहेत. यामुळे केस गळणे कमी होते. रक्त वाढते, मधुमेह नियंत्रणात राहतो. वाईट कोलेस्टरोल कमी होते.

अर्थात बाजरी मुळची भारतीय नाही. ४५०० वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या माली देशात तिचे पिक घेतले जात होते असे पुरावे मिळतात. तेथूनच ती भारतात आली. मात्र बाजरीचे सेवन हिवाळ्यातच करावे आणि शक्यतो दिवसा करावे असा सल्ला दिला जातो. बाजरीच्या सेवनाने इन्फेक्शनला प्रतिबंध होतो असेही सांगतात.