काश्मिर मध्ये सुरु होतेय पहिले मल्टीप्लेक्स

पृथ्वीवरचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या काश्मीर मध्ये ३० वर्षानंतर प्रथमच मल्टीप्लेक्स थियेटर सुरु होत असून श्रीनगरच्या शिवपोरा भागात हे तीन स्क्रीनचे थियेटर लवकरच सुरु होत आहे. येथे एकावेळी ५२० प्रेक्षक सिनेमांचा आनंद घेऊ शकणार आहेत. पारंपारिक काश्मिरी शैली आणि आधुनिकता याचा मनोहर संगम यांच्या बांधकामात दिसून येणार आहे. काश्मीर २.० ची ही नवी तस्वीर आहे असेही सांगितले जात आहे. कलम ३७० हटविले गेल्यानंतर दहशतवादी विचारधारा बाजूला सारून काश्मीर खोरे जगाच्या पावलाबरोबर पाउल टाकण्यास सज्ज झाल्याचे हे निदर्शक मानले जात आहे.

३७० कलम हटविल्यानंतर अनेक निर्माते चित्रपट, वेबसिरीज, डॉक्युमेंटरीचे शुटींग काश्मीर मध्ये करण्यास उत्सुक असून यावर्षी ५०० निर्मात्यांनी त्यासाठी परवानगी मागितली होती. पैकी १५० चित्रपट शुटींग साठी परवानगी दिली गेली आहे. जेथे सिनेमाच्या पडद्यावर जगभरातील प्रेक्षक काश्मीरचे सौदर्य पाहू शकतात तेथे काश्मिरी लोकांसाठी एकही सिनेमा हॉल नाही. म्हणजे काश्मिरी जनता त्यांच्या राज्याच्या सौंदर्याचा आनंद सिनेमा गृहात लुटू शकत नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार १९९० पर्यंत येथे १५ थियेटर्स होती. पण दहशतवाद फोफावल्यामुळे ती एक एक करत बंद करावी लागली. १९९९-२००० मध्ये पुन्हा एकदा थियेटर सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला पण सुरक्षा कारणास्तव ती सुरु करता आली नाहीत. २०१० मध्ये दहशतवाद्यांनी नीलम हे एकमेव थियेटर सुद्धा बंद पाडले. तेव्हापासून काश्मीर भागात एकही सिनेमा गृह नाही. पण आता काश्मिरी जनता परिवार, मित्रमंडळी सोबत चित्रपट पाहण्याचा आनंद नव्या मल्टीप्लेक्स मुळे लुटू शकणार आहे.