अजितदादा रागावले, अधिवेशन सोडून गेले 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणूक तयारीसाठी दिल्ली येथे घेतलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मानापमान नाट्य घडले. भाजप विरुद्ध लढाईची घोषणा येथे केली गेली पण राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे भाषण झाल्यावर नंबर दोनचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार रागावून निघून गेले. अजित दादा इतके नाराज झाले कि भर अधिवेशनात मंचावरून ते निघून गेले ते अधिवेशन संपले तरी पुन्हा फिरकले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या भाषणानंतर अजित दादा भाषण करण्यासाठी उभे राहिले पण मधेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचा पुकारा केला गेला आणि जयंत पाटील भाषण देण्यासाठी उठले. त्या मुळे रागावलेले अजित दादा तडक मंच सोडून निघून गेले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ते थांबले नाहीत आणि परतही आले नाहीत. या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल, ‘दादा वॉश रूम मध्ये गेले आहेत, परत येतील’ असे सांगताना दिसत आहेत पण दादा परत आले नाहीत.

या नाट्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सर्व आलबेल नाही याला पुष्टी मिळाली आहे. शरद पवार आणि अजितदादा यांच्यातील अंतर्गत कलह या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. राष्ट्रवादी मध्ये शरद पवारांचा एक गट आणि अजित दादांचा एक गट असे दोन गट झाले असल्याची चर्चा गेले काही दिवस सातत्याने होत आहे. पण महाराष्ट्रात सत्तेवर असताना ही दुही लपली होती ती सत्ता जाताच उघड्यावर आल्याचे बोलले जात आहे.