रेल्वेच्या चाकांची निर्यात करणार भारतीय रेल्वे

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी भारतीय रेल्वे आता रेल्वेची चाके निर्यातदार बनत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले रेल्वे चाके निर्यातदार बनण्याची ब्लू प्रिंट तयार झाली असून चाकांचा प्रकल्प उभारणीसाठी निविदा मागविल्या गेल्या आहेत. दरवर्षी या कारखान्यात किमान ८० हजार चाके तयार होतील. देशाच्या इतिहासात प्रथमच रेल्वेने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भारतात हायस्पीड रेल्वेसाठी व्हील प्लांट व व्हील बनविण्यासाठी आमंत्रित करणारी निविदा जारी केली आहे.

भारतीय रेल्वेसाठी दरवर्षी २ लाख चाके लागतात. योजनेनुसार स्टील अॅथोरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेल कडून १ लाख चाके पुरविली जातात. आता उर्वरित गरज मेक इन इंडिया प्लांट मधून भागविली जाणार आहे. निविदेसाठी अट घातली गेली असून त्यानुसार प्रकल्पातून युरोप मध्ये चाकांची निर्यात करावी लागणार आहे. हा प्रकल्प १८ महिन्यात सुरु करायचा आहे.

१९६० पासून भारत रेल्वे चाके आयात करत आहे. ही आयात प्रामुख्याने युरोपीय देशातून होते. आता मात्र भारतात उत्पादन आणि निर्यात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यासाठी लागणारा कच्चा माल देशात उपलब्ध असून पूर्ण तांत्रिक विश्लेशण केल्यानंतरच हा निर्णय घेतला गेला आहे.