Gautam Adani Wealth : गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत जेफ बेझोसला पछाडले


नवी दिल्ली : फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे. यापूर्वी या यादीत एक पायरी खाली घसरलेल्या अदानी यांनी पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. यावेळी ते पुन्हा एकदा जेफ बेझोसला मागे टाकत जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 148.8 अब्ज डॉलर
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनर्स इंडेक्सनुसार, कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत त्यांची एकूण संपत्ती 148.8 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या संपत्तीसह ते पुन्हा एकदा जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

गौतम अदानी यांच्या मागे आहेत Amazon चे प्रमुख
गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने एकेकाळी जगातील अव्वल क्रमांकाचे अब्जाधीश असलेले अॅमेझॉनचे संस्थापक आणि प्रमुख जेफ बेझोसही त्यांच्या मागे पडले आहेत. फोर्ब्स इंडेक्सनुसार जेफ बेझोस यांची संपत्ती 136.7 अब्ज डॉलरवर आली आहे. संपत्तीत घट झाल्यामुळे ते आता जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की गौतम अदानी लवकरच जेफ बेझोसला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकू शकतात. गौतम अदानी यांनी आता जेफ बेझोस यांना 12.1 अब्ज डॉलरने संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. आता जगात फक्त एलन मस्क, टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सीईओ आणि फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट हे गौतम अदानी यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.