Cyrus Mistry Death : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदनात समोर आल्या या गोष्टी


मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांना एका कार अपघातात अनेक दुखापती झाल्या आणि छातीच्या ठिकाण दुखापतीमुळे जवळजवळ तत्काळ मृत्यू झाला. जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. मिस्त्री यांना झालेल्या दुखापतीमुळे शरीराच्या आतून रक्तस्त्रावही होत असल्याचे त्यांनी सांगितले. मिस्त्री (54) आणि पांडोळे हे इतर दोन व्यक्तींसह रविवारी दुपारी गुजरातहून मुंबईला जात असताना त्यांची कार पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर जाऊन आदळली.

शवविच्छेदनात समोर आल्या या गोष्टी
या अपघातात कारमध्ये मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर यांचा मृत्यू झाला. स्त्रीरोग तज्ज्ञ अनाहिता पांडोळे (55) या गाडी चालवत होत्या आणि त्यांचा पती डॅरियस पांडोळे (60) हेही त्यांच्यासोबत बसले होते, जे बचावले. मिस्त्री आणि जहांगीरचे मृतदेह नंतर जेजे रुग्णालयात आणण्यात आले, जेथे डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकारी म्हणाले, कार वेगात असल्याने मिस्त्री आणि पांडोळे या दोघांच्या अंगाला अचानक धक्का बसला. यामुळे अनेक जखमा झाल्या आणि छातीला दुखापत झाली. ते म्हणाले, शरीराच्या आतल्या रक्तवाहिन्या फुटल्या होत्या, त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. मात्र, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात काही लक्षणेच दिसून आली. तपशीलवार विश्लेषणात सर्व काही स्पष्ट होईल आणि मृत्यूचे खरे कारण कळेल. ते म्हणाले की, मानक प्रक्रियेनुसार व्हिसेरा नमुना तपासणीसाठी कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठविला जाईल.

मुंबईत करण्यात आले मिस्त्री यांच्यावर अंत्यसंस्कार
सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी कार अपघातात मिस्त्री यांचा मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते. मध्य मुंबईतील वरळी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत हिंदू विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिस्त्री 2012 ते 2016 या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचा रविवारी दुपारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात रस्ता अपघातात मृत्यू झाला. ते दोघेही दक्षिण गुजरातमधील उदवाडा येथून परतत होते, जे झोरास्ट्रियन धर्माच्या लोकांसाठी सर्वात पवित्र ठिकाण आहे. मिस्त्री यांचे पार्थिव जेजे रुग्णालयातून पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या वाहनात आणण्यात आले आणि मंगळवारी सकाळपासून वरळीच्या स्मशानभूमीत ठेवण्यात आले, जेणेकरून मित्र आणि नातेवाईक त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील.