चीन मध्ये ६.५ कोटी नागरिक लॉकडाऊनमध्ये

झिरो कोविड पॉलिसी धोरणावर ठाम असलेल्या चीन सरकारने आगामी काळात येत असलेल्या मोठ्या सुट्टी मध्ये नागरिकांनी प्रवासासाठी बाहेर पडू नये याची काळजी घेतली आहे. देशांतर्गत प्रवासावर प्रतिबंध यावा म्हणून चीन सरकारने देशातील ३० शहरात लॉकडाऊन लावला असून सुमारे साडे सहा कोटी नागरिक यामुळे आपापल्या घरात आणि शहरात बंदिस्त झाले आहेत.

दक्षिण पश्चिम चेंगडू शहरातील सुमारे २.१ कोटी नागरिक त्यांच्या सदनिका किंवा रहिवासी परिसरात बंदिस्त आहेत. तियान्जिन या बंदर शहरात कोविडच्या १४ केस सापडल्या असून येथील शाळा ऑनलाईन सुरु केल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशन रिपोर्ट नुसार सोमवारी करोनाच्या नव्या १५५२ केसेस आढळल्या आहेत. हा आकडा फार मोठा नसला तरी शून्य कोविड नीतीचे काटेखोर पालन केले जात असल्याने लॉकडाऊन, विलगीकरण व संक्रमित व्यक्तीच्या सहवासात आल्यास घरात कैद असे उपाय राबिविले जात आहेत.

१० ते १२ सप्टेंबर या काळात चीनी न्यू ईअर नंतरचा दुसरा मोठा उत्सव, शारदोत्सव चीन मध्ये साजरा होत असून या काळात राष्ट्रीय सुट्टी दिली जाते. मात्र या काळात नागरिकांनी स्थानिक प्रवास करू नये यासाठी त्यांना त्यांच्या शहरातून बाहेर पडण्याची परवानगी नाकारली गेली आहे. ३३ शहरात रहिवाश्यांना घर आणि आसपासच्या परीसरापुरते सीमित केले गेले आहे. कोविड मुळे चीनची अर्थव्यवस्था, प्रवास आणि समाजावर विपरीत परिणाम दिसत आहेत मात्र तरीही सरकार त्यांची धोरणे मागे घेण्यास तयार नाही असे समजते.