बिग बी बनले संगीतकार

बॉलीवूड मधील सुमारे ५४ वर्षांच्या कारकिर्दीत बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अनेक ध्येये गाठली, अनेक क्षेत्रे गाजवली. अभिनय, गायक, चित्रपट निर्माता अश्या अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या तरी नवीन काही करण्याची त्यांची उमेद अजून कायम आहे. लवकरच येत असलेल्या आर बाल्की यांच्या ‘चुप, रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटाच्या संगीतकार श्रेणी मध्ये अमिताभ यांचे नाव झळकणार आहे. बिगबी यांच्या बॉलीवूड कारकिर्दीत प्रथमच फिल्म क्रेडीट मध्ये ते संगीतकार म्हणून सामील असतील. या चित्रपटात दुलकर सलमान, सनी देओल, श्रेया धन्वंतरी, पूजा भट्ट यांच्या भूमिका असून हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेते, निर्माते गुरुदत्त यांना श्रद्धांजली म्हणून बनविला गेला आहे.

या संदर्भात माहिती देताना बाल्की म्हणाले, जे घडले ते अचानक घडले. त्यांनी अमिताभ बच्चन यांना हा चित्रपट पहा असे सांगितले होते. बिगबी यांनी तो पाहिल्यावर बाल्की यांना जवळ बोलावले आणि पियानोवर एक धून वाजवून दाखविली. बिग बी म्हणाले,’ हा चित्रपट आणि त्यातील कलाकार यांच्या विषयीच्या माझ्या भावना या धून सारख्या आहेत.’ बाल्की यांना ही धून अतिशय आवडली आणि त्यांनी बिग बी यांना ही धून चित्रपटात वापरू का असे विचारताच अमिताभ यांनी ही धून त्यांना गिफ्ट करून टाकली. त्यामुळे चुप हा पहिलाच चित्रपट आहे ज्याला बिग बी यांच्या कंपोझीशनचा अधिकृत लाभ झाला आहे.

‘चुप, रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा सायकॉलॉजीकल थ्रिलर २३ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. त्याचा टीझर जून मध्ये आला होता.