आली तीनचाकी, उडणारी स्पोर्ट्स कार

जगातील पहिली तीनचाकी,उडणारी स्पोर्ट्स कार तयार झाली असून तिच्या उड्डाणाच्या चाचण्या घेण्यास परवानगी मिळाली आहे. ‘स्विचब्लेड’ नावाची ही कार अमेरिकन कंपनी सॅमसन स्कायने तयार केली असून गेली १४ वर्षे त्यासाठी सतत संशोधन सुरु होते असे समजते. ही स्पोर्ट्स कार ताशी ३२२ किमी वेगाने उडू शकते आणि जमिनीवर तीन चाकांच्या मदतीने सहज चालविता येते. तिची लांबी ५.१ मीटर असून घराच्या गॅरेज मध्ये ती सहज पार्क करता येते. जमिनीवर ही कार तशी २०१ किमी वेगाने धावू शकते.

विमानतळावर नेल्यावर तिचे पंख आणि शेपटीचा भाग उघडता येतो आणि त्यासाठी फक्त तीन मिनिटे लागतात. आकाशात उड्डाण करण्यासाठी तिला पंख आणि शेपटी आवश्यक आहे. गेल्या महिन्यात स्विचब्लेडला अमेरिकन सरकारच्या फेडरल अॅव्हीएशन अॅडमिनीस्ट्रेशनने मंजुरी दिली आहे. या कारची इंधन टाकी ११३ लिटरची आहे. पण टाकी पुन्हा भरण्याची वेळ येण्यापूर्वी ही कार ४५० मैल म्हणजे ७२४ किमीचे अंतर पार करण्यास सक्षम आहे. या कारच्या अनेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

जमिनीवर ही कार टॅक्सीप्रमाणे चालविता येणार आहे. तिचा टेक ऑफ स्पीड ताशी ८८ मैल असून ती १३००० फुट उंचीवरून उडू शकते. लँड होताच ड्रायविंग मोड मध्ये येते. या कार साठी जगातील ५२ देशांनी आणि अमेरिकेतील ५० राज्यातील २१०० ग्राहकांनी बुकिंग केले आहे. त्यात नासाचे इंजिनिअर्स, पायलट, उद्योगपती यांचा समावेश आहे. या कार साठी वाहन चालक परवाना आणि पायलट लायसन्स दोन्ही आवश्यक आहे. या कारची किंमत १३ कोटी असल्याचे समजते.