म्हणून १० दिवसांनी केले जाते गणेश विसर्जन

गणेशोत्सव आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे आणि गणरायाच्या स्थापनेच्या तयारीला जोरदार सुरवात झाली आहे. गणपतीच्या मखरापासून ते अन्य पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात यंदा कोविडच्या दोन वर्षानंतर प्रथमच मोकळेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे. दहा दिवस गणपती बाप्पाच्या सेवेत भाविक मग्न राहणार आहेत आणि नंतर सुरु होणार बाप्पाला निरोप देण्याच्या तयारीची. गणपती विसर्जन दहाव्या दिवशीच का करायचे याचे अनेक संदर्भ दिले जातात. त्यासाठी पुराणाचे दाखले दिले जातात. गणपती विसर्जन आणि महाभारत यांचा संबंध आहे हे मात्र अनेकांना माहिती नसेल.

अनेक घरात गणपती दीड दिवसाचा, पाच दिवसांचा, गौरी बरोबर आणि दहा दिवसांचा अश्या अनेक प्रकारे बसविला जातो. प्राचीन कथेनुसार गणपतीचे १० व्या दिवशी विसर्जन आणि महाभारत यांचा संबंध आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश स्थापना होते. असे सांगतात याच दिवशी महर्षी व्यास यांनी महाभारत लिहायची सुरवात केली. लिखाणाचे काम बुद्धीची देवता गणेशाकडे होते. गणेशाने व्यास ऋषींना एक अट घातली कि एकदा लिहायला सुरवात केल्यावर मध्ये थांबणार नाही. तेव्हा व्यास म्हणाले, मी साधा ऋषी आहे. श्लोक सांगताना काही चूक झाली तर दुरुस्त करून आपण लिखाण करावे.

हे लेखन सतत १० दिवस चालले आणि ते संपले त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. सतत एकाच जागी बसल्याने गणपतीचा देह आखडून गेला. माती धुळीने भरला. तेव्हा सरस्वती नदीत स्नान करून गणेशाने शरीर स्वच्छ केले. तेव्हापासून गणेश प्रतिमा विसर्जन करण्याची प्रथा पाळली जाते. याचे अध्यात्मिक महत्व म्हणजे हे दहा दिवस आपल्याला ‘संयम ठेवा, मनावर चढलेला मळ काढून टाका आणि मन स्वच्छ करा’ असे सांगतात.