जस्टीस ललित यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार तीन पिढ्या

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून मूळचे महाराष्ट्राच्या सोलापूरचे उदय उमेश ललित आज शपथग्रहण करणार आहेत. केवळ ७४ दिवसांचा त्यांचा हा कार्यकाल असणार आहे. विशेष म्हणजे ललित यांच्या घरात १०२ वर्षे वकिलीची परंपरा आहे. त्यांचे आजोबा रंगनाथ ललित स्वातंत्र्यापूर्वीच सोलापूर येथे वकिली करत होते. वडील उमेश हायकोर्ट जज्ज होते तर उदय यांचे सुपुत्र हर्षद आणि श्रीयश दोघे इंजिनिअर आहेत आणि पैकी श्रीयश यांनी त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेतले आहे. या शपथविधीला उदय यांच्या पत्नी अमिता, ९० वर्षाचे वडील उमेशराव आणि मुले उपस्थित राहणार आहेत.

जस्टीस ललित हे गुन्हेगारी कायद्यातील तज्ञ आहेत. २०१४ मध्ये त्यांना क्रिमिनल वकीलीतून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदोन्नती दिली गेली होती. मे २०२१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

१० जानेवारी २०१९ ला सुरु झालेल्या अयोध्या विवाद संदर्भातील सुनावणीसाठी नेमल्या गेलेल्या पाच न्यायाधीशांच्या पिठातून ललित स्वतः बाजूला झाले होते. त्यामागचे कारण देताना त्यांनी २० वर्षपूर्वी अयोध्या विवाद संदर्भातील गुन्हेगारी दाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांचे वकीलपत्र घेतले होते असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांनी तीन तलाक, केरळ पद्मनाभ मंदिरावरील त्रावणकोर शाही परिवाराचा दावा, पोक्सो संबंधित कायदा अश्या अनेक महत्वाच्या दाव्यांवर निर्णय दिले आहेत. ललित सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. त्यांच्यानंतर ५० वे सरन्यायाधीश म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे डी.वाय चंद्रचूड यांची नेमणूक होणार आहे. त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा असणार आहे.