महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा – कोविडमध्ये पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खर्च उचलणार


मुंबई: कोविड-19 मुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोघेही पालक गमावले आहेत, त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. ज्यांच्या पालकांचा कोविड-19 महामारीमध्ये मृत्यू झाला आहे, अशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली असून अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार पुढे येईल, असे सांगितले.

विधानसभेत उपस्थित केला प्रश्न
पीटीआयच्या वृत्तानुसार, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली. काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रश्नाला राज्याचे शिक्षणमंत्री उत्तर देत असताना त्यांनी ही घोषणा केली.

इतक्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलणार सरकार
या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे शिक्षणमंत्री पाटील पुढे म्हणाले की, कोविड-19 साथीच्या आजारात अनेक विद्यार्थ्यांनी आपले दोघेही पालक गमावले आहेत. या साथीच्या आजारात पदवीपूर्व वर्गातील 931 आणि शासकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गातील 228 विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क सरकार भरणार आहे.

इतका वाढेल खर्च
राज्याचे शिक्षण मंत्री पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 2 कोटी रुपयांहून अधिक बोजा पडेल आणि राज्य सरकारला दरवर्षी असे निर्णय घेण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक या महामारीमुळे राहिले नाहीत, त्यांच्यासाठी हे खूप सोयीचे ठरेल. आता त्याचे शिक्षण अपूर्ण राहणार नाही आणि फीची चिंताही डोक्यात येणार नाही.