शाओमीने ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी

केवळ चीनच नव्हे तर भारतासह जगाच्या स्मार्टफोन बाजारात दबदबा असलेल्या चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी गेले आहे. करोना झटक्यातून अजून पूर्णपणे बाहेर न पडलेल्या या कंपनीचा महसूल लक्षणीय रित्या घटल्याने ३ टक्के कर्मचारी कपात केली गेल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीचे अध्यक्ष वांग जियांग म्हणाले चीन बाजारावर पुन्हा करोना इफेक्ट जाणवू लागला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा दोन्ही बाबीत घट झाली आहे. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, खर्च आणि महागाई यामुळे मंदीचे सावट आहे. त्यामुळे अन्य देशात सुद्धा कंपनीच्या फोन विक्रीवर परिणाम झाला आहे. विक्री वाढावी म्हणून जाहिराती वर खर्च केला जात असल्याने कंपनीचा निव्वळ नफा कमी झाला आहे.

दुसर्या तिमाहीत कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. जगातील सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट चीन मध्ये कोविड प्रतिबंधामुळे २० टक्के विक्री घटली आहे. शाओमीची सर्वाधिक कमाई मोबाईल विक्रीतूनच होते. विक्री कमी झाल्याने महसुलात २९ टक्के घट झाली आहे. २०२२ च्या सुरवातीपासून कंपनीच्या शेअर मध्ये ४० टक्के घट झाली आहे, चीनची कोविड लढाई अजून सुरु आहे असे जियांग यांनी सांगितले.