व्हीपवरुन शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांचा राडा


मुंबई – महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही सदस्यही घोषणाबाजीत सहभागी झाले होते.

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक वाया गेले, त्याकडे शिंदे सरकारने दुर्लक्ष केल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले. सरकारच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यावर कायदेशीर चर्चा होत आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेले पावसाळी अधिवेशन 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

हे असंवैधानिक असल्याचे सांगत विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यापूर्वी सांगितले आहे की, शिंदे सरकार ज्या पद्धतीने सत्तेवर आले, त्यावरून हे सरकार विहित घटनात्मक नियमांनुसार स्थापन झालेले नाही, असे आमचे मत आहे. यासंबंधीच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित आहे.

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतरचे पहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पण, पक्ष कार्यालयावरून भांडण होऊ नये म्हणून शिंदे गटाने सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय उभारले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटामध्ये व्हीपच्या मुद्द्यावरून दावे-प्रतिदावे होत आहेत. आम्ही जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू असेल, असे सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. माझी या पदावर नियमानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही व्हीप लागू करण्यात येणार आहे.