युरोपात ५०० वर्षातला भीषण दुष्काळ

चांगली हवा, सुंदर वातावरण आणि भरपूर पाणी, गुलजार थंडी अशी वैशिष्टे असणाऱ्या युरोप मध्ये यंदा ५०० वर्षातील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. युरोपियन युनियन आणि ब्रिटन मधील सुमारे ६३ टक्के जमीन पिकांवाचून रिकामी राहिली असून सरकारने अॅलर्ट जारी केला आहे. नद्यांचे पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी पुरेसे पाणी मिळू शकलेले नाही शिवाय उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे भूगर्भातील पाणी पातळी घटली आहे.

हंगेरी मध्ये गेल्या ५० वर्षातील हा सर्वात तीव्र दुष्काळ आहे. हन्गेरीतून युरोपात जाणाऱ्या मोठ्या नद्यांपैकी एक, डॅन्यूबचे पाणी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे तीन लाख हेक्टरवरील मका आणि दोन लाख हेक्टर वरील सुर्यफुल पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे. स्पेन मधील २/३ भाग उजाड झाला असून शेतीला पाणी नाही. बार्सिलोना मधील भूजल पातळी घसरली आहे. कृषी उत्पन्नात तीन नंबरवर असलेल्या या देशात ७० टक्के पाणी शेतीसाठी दिले जाते. पण दुष्काळामुळे पिके धोक्यात आली आहेत.

इंग्लंड मध्ये १९३६ नंतर प्रथम जुलै मध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीपातळी गेल्या तीस वर्षात सर्वात कमी आहे त्यातच तापमान वाढीमुळे खाद्यान्न संकट निर्माण झाले आहे. इटलीच्या पाच विभागात आणीबाणी जाहीर केली गेली आहे. पाउस खूपच कमी झाला आहे आणि उन्हाळा तीव्र असल्याने नद्या आटल्या आहेत. डोरा बाल्तेया आणि पो या दोन नद्या लाखो लोकांची तहान भागवत असतात आणि हजारो एकर जमिनीचे सिंचन करतात. पण या नद्याच आटल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जर्मनीच्या ऱ्हाईन नदीचे पाणी कमी झाल्याने जलवाहतूक, मालवाहतूक बंद पडली आहे. फ्रांस मध्येही नद्या सुकत आहेत.