पोलीस हवेत? या राज्यात भाड्याने मिळतात पोलीस

देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांवर असते हे आपण जाणतो. पण भारताच्या केरळ राज्यात पोलीस भाड्यावर मिळू शकतात याची माहिती अनेकांना नसेल. ठरलेली किंमत चुकती केली की या राज्यात पोलीस शिपायापासून पोलीस आयुक्तांपर्यंत सर्व श्रेणीतील पोलीस भाड्याने घेता येतात. अगदी पूर्ण पोलीस स्टेशन सुद्धा भाड्याने घेता येते.

दिवसभरासाठी हवालदार हवा असेल तर ७०० रुपये, दिवसभरासाठी इन्स्पेक्टर हवा असल्यास २५६० रुपये आणि पूर्ण ठाणे हवे असल्यास दिवसाचे ३३१०० रुपये भरावे लागतात. एक व्यक्तीने मुलीच्या लग्नासाठी व्हीआयपी येणार आहेत असे सांगून चार हवालदार भाड्याने घेतले आणि या लग्नात कुणीही व्हीआयपी नव्हता. ही बाब उघडकीस आल्यावर अनेक पोलीस अधिकाऱ्यानी या नियमास विरोध केला आहे. पोलीस असोसिएशन केरळ पोलीस अधिनियम कलम ६२(२) नुसार कुणीही व्यक्ती खासगी कारणासाठी पोलिसांचा वापर करू शकत नाही असे या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

केरळमध्ये कामाच्या हिशोबाने आणि कुठल्या दर्जाचा पोलीस हवा त्यानुसार भाडे ठरविले जाते. फिल्म शुटींग. लग्न समारंभ, खासगी सुरक्षा या कारणाने पोलीस हवे असतील तर कमिशनर रँकसाठी दिवसाला ३९९५ रुपये वर रात्रीपर्यंत हवे असल्यास ४७५० रुपये असे पैसे द्यावे लागतात. पोलीस सुप्रीटेंडंट साठी दिवसाला २५६० आणि रात्री साठी ४३६० रुपये द्यावे लागतात. पोलीस डॉग साठी ६९५० रुपये दर आहे.