अमरनाथ यात्रेत यंदा विक्रमी ३.६५ लाख भाविक

करोना मुळे दोन वर्षे बंद राहिलेल्या आणि या वर्षी पुन्हा सुरु केल्या गेलेल्या अमरनाथ यात्रेसाठी यंदा २०१६ नंतर प्रथमच यात्रेकरूंच्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक केले आहे. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक आकडा आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी यंदाची यात्रा समाप्त झाल्यावर ही माहिती दिली आहे.

सिन्हा म्हणाले, करोना नंतर यंदा प्रथमच यात्रा झाली आणि एकूण ४४ दिवसांच्या या यात्रेतील २२ दिवस हवामान खराब असल्याने यात्रा मध्ये थांबविली गेली होती. तरी यात्रेकरू मोठ्या संख्येने आले. यंदा यात्रा मार्गावर निवासाच्या अधिक सुविधा उपलब्ध केल्या गेल्या होत्या. पोलीस, सुरक्षा दले, स्वयंसेवक जागोजाग तैनात होते. शिवाय यात्रेकरूना आरएफ आयडी ट्रॅकिंग सुविधा दिली गेली होती. त्यामुळे हवामान अचानक खराब झाले तरी चुकलेल्या किंवा अडकून पडलेल्या यात्रेकरूंचा शोध घेणे शक्य झाले. दरवेळी साधारण यात्रा मार्गावर ७० हजार यात्रेकरूंच्या मुक्कामाची व्यवस्था असते यंदा १.२५ लाख यात्रेकरूंच्या निवासाची सोय केली गेली होती.

२०१६ साली या यात्रेत २,२०,४९० नोंदणीकृत यात्रेकरू होते. तर २०१९ मध्ये हाच आकडा ३,४३,५८७ वर गेला होता. मध्ये दोन वर्षे करोना मुळे यात्रा होऊ शकली नाही. त्यानंतर या वर्षी ३.६५ लाख नोंदणीकृत यात्रेकरुंनी बर्फानी बाबाचे दर्शन घेतले.