किरॉन पोलार्डने रचला इतिहास, 600 T20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटर


वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्ड हा टी-20 फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पोलार्डने टी-20 फॉरमॅटमध्ये नवा इतिहास रचला आहे. पोलार्ड 600 टी-20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. द हंड्रेड लीगमध्ये लंडनकडून खेळताना पोलार्डने हा इतिहास रचला आहे. पोलार्डने या वर्षी एप्रिलमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

पण 34 वर्षीय पोलार्डने जगभरातील वेगवेगळ्या देशांतर्गत टी-20 लीगमध्ये खेळणे सुरूच ठेवले आहे. पोलार्डने आपल्या 600 व्या सामन्यात बॅटने अप्रतिम कामगिरी केली आणि 11 चेंडूत 34 धावा केल्या. पोलार्डच्या खेळीत चार षटकारांचा समावेश होता.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पोलार्ड गेल्या 12 वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळतो. पोलार्ड ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्नकडून खेळला आहे. पोलार्ड पाकिस्तान सुपर लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही खेळतो. पोलार्ड पुढील वर्षी सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगचाही भाग होऊ शकतो.

आघाडीवर आहे पोलार्ड
पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द मात्र फार काळ टिकली नाही. पोलार्डने वेस्ट इंडिजसाठी 101 टी-20 सामने खेळले आणि त्यात 1569 धावा केल्या. पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच, पोलार्डने 600 टी-20 सामन्यांमध्ये 11,723 धावा केल्या आहेत आणि तो 309 विकेट्स घेण्यातही यशस्वी झाला आहे.

पोलार्ड सध्या जगातील सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे. दुसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो आहे, ज्याने 543 टी-20 सामने खेळले आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक 472 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने 463 टी-20 सामने खेळले आहेत. इंग्लंडच्या रवी बोपाराने 426 टी-20 सामने खेळले आहेत.