नितीश कुमार यांचा राजीनामा, आता महाआघाडीसोबत स्थापन करणार सरकार


नवी दिल्ली : बिहारमध्ये अखेर तसेच घडले ज्याची शक्यता तीन-चार दिवसांपासून वर्तवली जात होती. भाजपवर नाराज असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते राजद, काँग्रेस आणि डाव्यांसह नवीन सरकार स्थापन करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या तीन-चार दिवसांत नितीश कुमार महाआघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

बिहारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज पाटण्यात जेडीयू, आरजेडी, भाजपसह इतर पक्षांची बैठक झाली. राबरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजद, काँग्रेस आणि डाव्यांच्या आमदारांनी नितीशकुमार यांच्यावर विश्वास दाखवला. दुसरीकडे, जेडीयूच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाला आमदारांनी सहमती दर्शवली.

160 आमदारांच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करण्याचा केला दावा
नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यानंतर नितीश कुमार यांनी 160 आमदारांच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचेही सांगितले.

नितीश कुमार यांची राबडी देवींच्या निवासस्थानी आरजेडी नेत्यांशी बैठक
राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीशकुमार यांनी थेट तेजस्वी यादव यांचे घर गाठले. जिथे त्यांची राजदच्या इतर नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. राजीनाम्यापूर्वी जेडीयूच्या बैठकीत नितीशकुमार म्हणाले की, भाजपने आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपने आम्हाला संपवण्याचा कट रचला. यापूर्वी जेडीयूच्या बैठकीत एनडीएपासून वेगळे होण्याचा आणि भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नितीश म्हणाले – बैठकीत सर्वांनी सांगितले एनडीए आघाडी सोडण्यास
राज्यपालांकडे राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर पडताना नितीश कुमार म्हणाले की, बैठकीत सर्व आमदार आणि खासदारांना एनडीए आघाडी सोडण्यास सांगितले. त्यामुळेच आम्ही एनडीए आघाडीतून बाहेर पडत आहोत. युती सोडण्यावर नितीश फारच कमी बोलले असतील, पण अनेक कारणांमुळे ते भाजपवर नाराज होते हेच खरं.