साईबाबाच्या शिर्डीत पावसाचा धुमाकूळ

अहमदनगर जिल्यात गेल्या दोन दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिरडीला बसला असून शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रसिद्ध साई संस्थानच्या प्रसादगृहात आणि मंदिर परिसरात फुटभर पाणी साठले आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो आहे. या भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. ग्रामीण भागातील कच्चे रस्ते उखडले गेले आहेत.

शिर्डीच्या महावितरण सब स्टेशनसह शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पाणी साठले आहे. गेले दोन तीन दिवस नगर जिल्यात सलग पाउस कोसळत आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून १२ पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. हजारो घरात पाणी घुसले आहे. शिरडी मध्ये देश विदेशातून, दररोज, दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. श्रावण महिना असल्याने भाविकांची गर्दी जास्त आहे. पावसाचे पाणी जागोजागी मोठ्या प्रमाणावर साठल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.