पीव्ही सिंधूला सुवर्ण- असा बदलत गेला मेडलचा रंग

बर्मिघम कॉमन वेल्थ गेम्स २०२२ च्या शेवटच्या दिवशी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने महिला एकेरी मध्ये कॅनडाच्या मिशेल ली चा २१-१५,२१-१३ असा सरळ दोन सेट मध्ये पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केलीच पण कॉमनवेल्थ गेम्स मधील आपल्या पदकाचा रंगही बदलला. सिंधूचे हे तिसरे वैयक्तिक मेडल असून मिशेल विरुद्धचा हा तिचा नववा विजय आहे. मिशेल आणि सिंधू यांनी एकमेकांविरुद्ध आत्तापर्यंत ११ सामने खेळले आहेत.

यापूर्वीच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिंधूला प्रथम ब्राँझ मेडलवर २०१४ मध्ये समाधान मानावे लागले होते आणि त्या स्पर्धेत उपांत्य फेरीत याच मिशेलने सिंधूला हरवून रजत पदक घेतले होते. त्यावेळी बोलताना सिंधूने तिच्या पदकाचा रंग सोनेरी झाल्याचे पाहायचे आहे असे म्हटले होते. या स्पर्धेत सिंधूने मलेशियाच्या टी जिंग हिला हरवून ब्राँझ कमाई केली होती.

२०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिंधूने रजत पदकाची कमाई केली होती. तिला त्यावेळी सायना नेहवालने अंतिम फेरीत हरविले होते आणि सुवर्ण पदक जिंकले होते. आता कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सिंधूने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या बॅडमिंटन इतिहासात सिंधू मोठी खेळाडू आहे. तिने ऑलिम्पिक मध्ये सिल्व्हर आणि ब्राँझ पदके मिळविली आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड चँपियनशिप मध्ये तिने एका सुवर्णपदकासह दोन रजत आणि दोन ब्राँझ पदके मिळविली आहेत. एशियन गेम्समध्ये तिने रजत पदकाची कमाई केली होती.

बर्मिहम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये एकेरीचे सुवर्णपदक जिंकल्यावर सिंधूने स्टँड मधील तिच्या चाहत्यांसह सेल्फी शेअर केली आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी महिला एकेरी सुवर्णपदक मिळविणारी सायना नंतरची सिंधू दुसरी खेळाडू आहे.