येत्या 48 तासांत बिहारमध्ये स्थापन होऊ शकते नवे सरकार! जेडीयूने बोलावली खासदार-आमदारांची बैठक, आरजेडीही सक्रिय


पाटणा : जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. जेडीयू नाव न घेता भाजपवर हल्लाबोल करत आहे. त्याचवेळी, या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात केव्हाही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 11 ऑगस्टपर्यंत नवे सरकार स्थापन होण्याचीही चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने येत असल्याचे मानले जात आहे. या चर्चेनंतर जेडीयूने आता मंगळवारी आपल्या सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राजदचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादवही सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

का आहेत नितीशकुमार नाराज ?
मिळालेल्या माहितीनुसार, सरकार चालवण्यात फ्री हँड न मिळण्यासोबतच चिराग प्रकरणानंतर नितीश आरसीपी प्रकरणावरून भाजपवर नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांत नितीश यांनी अनेक महत्त्वाच्या बैठकांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी कोरोनावर बोलावलेल्या बैठकीपासून नितीश दूर राहिले. अलीकडेच, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ मेजवानी देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभापासून स्वतःला दूर ठेवले. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपासून दूर राहिल्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीपासून दूर राहत आहेत.

नितीश यांच्या विरोधात रचले गेले षडयंत्र : जेडीयू
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह म्हणाले, भविष्यात मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा त्यात जेडीयूचा समावेश केला जाणार नाही. मुख्यमंत्री नितीश यांचा हा निर्णय आहे. एवढेच नाही, तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती अद्याप ठरलेली नसल्याचे लालन यांनी स्पष्ट केले. भाजपवर आरोप करताना सिंह म्हणाले की, नितीश यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. त्यांची उंची कमी करण्याचे षडयंत्र रचण्यात येत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मॉडेल बनवून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले गेले आणि आता आरसीपीला मॉडेल बनवले जात आहे. वेळ आल्यावर पक्षांतर्गत कोणते कारस्थान सुरू होते हेही स्पष्ट केले जाईल.