जो बायडेन तिसऱ्यांदा करोनाच्या विळख्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पुन्हा किमान पाच दिवसांच्या विलगीकरणात जावे लागले आहे. शनिवारी त्यांची करोना टेस्ट पुन्हा पॉझीटिव्ह आली असे व्हाईट हाउसकडून सांगितले गेले आहे. २१ जुलै रोजी बायडेन यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे त्यांना विलगीकरणात जावे लागले होते. त्यानंतर  गेल्या मंगळवारी आणि बुधवारी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. पण आगामी मंगळवारी म्हणजे उद्या ते मिशिगन दौऱ्यावर जाणार होते तेव्हा दोन तासांपूर्वी केली गेलेली त्यांची करोना चाचणी पुन्हा सकारात्मक आली आहे. एकदा संक्रमण झाल्यावर आणि त्यातून बरे झाल्यावर पुन्हा लगेच संक्रमण होण्याचा हा प्रकार अनोखा मानला जात आहे.

व्हाईट हाउसचे डॉ. एक्विन ओ’केमोर यांनी या संदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्यात बायडेन यांची करोना चाचणी पुन्हा सकारात्मक आल्याचे म्हटले गेले आहे. मात्र बायडेन यांच्यामध्ये करोनाची लक्षणे अगदी सौम्य आहेत असा खुलासा केला गेला आहे. पण रोग नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या गाईडलाईन नुसार चाचणी सकारात्मक आल्याने किमान पाच दिवस बायडेन यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. अमेरिकेत कोविड १९ च्या ओमिक्रोन व्हेरीयंटचे सबव्हेरीयंट बीए.५ चा प्रसार फारच वेगाने होत असून अमेरिकेतील एकूण करोना संक्रमितांच्या मध्ये बीए.५ च्या संक्रमितांचे प्रमाण ८० टक्के इतके आहे असे समजते.