बंगालमध्ये पुन्हा खेला होबे: मिथुन चक्रवर्ती यांनी केला टीएमसीचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा, उडाली राजकीय खळबळ


कोलकाता – पश्चिम बंगालच्या राजकारणातील भाजपचे नेते आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी कोलकाता येथे मोठे वक्तव्य करून बंगालच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आधी त्यांनी विचारले तुला ब्रेकिंग न्यूज हवी आहे का? यानंतर ते म्हणाले की, आजच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या जवळपास 38 आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध आहेत. त्यापैकी सुमारे 21 जण आमच्या थेट संपर्कात आहेत. ते म्हणाले की हा फक्त एक ट्रेलर आहे, चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे.

तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार प्रतिमा मंडल यांनी बुधवारी लोकसभेत दावा केला की, देशात द्वेष आणि हिंसाचाराचे वातावरण वाढत आहे. याला सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा मिळत आहे. त्यावर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी तृणमूलचे खासदार सभागृहात खोटे बोलले आहेत, असा प्रहार केला. दिशाभूल करत आहेत, कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. पश्चिम बंगाल सरकार या प्रकरणात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.


महागाईसारख्या मुद्द्यांवरून देशाचे लक्ष वळवण्यासाठी द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा दावा प्रतिमा मंडल यांनी सभागृहात शून्य प्रहरात केला. त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत, तर स्थानिक पातळीवर सुरक्षेचे आव्हान निर्माण होऊ शकते. सरकारने झोपेतून जागे होऊन योग्य ती पावले उचलावीत.

त्यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, खासदार महोदयांनी तथ्यहीन खोटे आरोप केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. त्यांनी पश्चिम बंगालबद्दल बोलायला हवे होते, जिथे सरकार अपयशी ठरले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत.