चीन मध्ये युवा बेरोजगारांची संख्या प्रचंड, नागरिकांना बँकेतून मिळेनात त्यांचेच पैसे
जगातील बडी अर्थव्यवस्था म्हणून चीन कडे पाहिले जात असले तरी त्या तुलनेत चीन मध्ये बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा प्रचंड मोठे असून ते १९.३ टक्के असल्याचे २०२२ च्या रिसर्च डेटा वरून समोर आले आहे. अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण चीनच्या निम्मे आहे. चीन मध्ये १६ ते २४ वयोगटातील युवक वेगाने बेरोजगारीकडे वाटचाल करत आहेत. इंजिनिअरची पदवी घेतलेले दीड कोटी पदवीधर सरकारी नोकरीत क्लार्क म्हणून नोकरी मिळावी यासाठी अर्ज करू लागले आहेत. यंदाच्या वर्षात १.२ कोटी इंजिनीअर्स बेकार असून त्यांना काम मिळत नाही.
करोना नियमावली चीन सरकारने अतिशय कडक राबविली त्यामुळे अनेक कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागली. त्यामुळे हे कर्मचारी रस्त्यावर आले. रिअल इस्टेट आणि शिक्षण क्षेत्राला सरकारी धोरणांचा फटका बसला परिणामी १.६ कोटी पदवीधर नोकरी मिळवू शकले नाहीत. चीन मध्ये आज घडीला ८ कोटी युवक बेरोजगार असून २०२२ हे वर्ष चीन साठी कठीण असल्याचे मानले जात आहे. कारण या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४.६० लाख कंपन्या बंद पडल्या आहेत तर ३१ लाख व्यावसायिक, उद्योजक दिवाळखोर झाले आहेत.
यामुळे चीन मध्ये सध्या बँकेतून आपलेच पैसे काढणे सुद्धा नागरिकांना शक्य होत नाही. बँक ऑफ चायनाने बँकेतील नागरिकांचा पैसा ही गुंतवणूक असल्याचे जाहीर केले आहे आणि हा पैसा नागरिकांना काढता येणार नाही असे म्हटले आहे. अर्थात या विरुद्ध नागरिकांनी विरोध सुरु केला आहे . नागरिकांनी बँकेत जाऊन पैश्यांसाठी तगादा लावू नये म्हणून बँकेबाहेर सरकारने रणगाडे आणि चिलखती वाहने तैनात केली आहे.