प्रथिनांच्या अभावाबाबत अज्ञान


आपण घेत असलेला आहार हा प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ या तिन्हींच्या बाबतीत समतोल असला पाहिजे असा आरोग्याचा साधा नियम आहे आणि परंपरेने आपण जे अन्न खात आलो आहोत त्या अन्नाची योजना असा समतोल साधण्याच्या दृष्टीनेच केलेली आहे. मात्र आता आपण अधिक व्यापक विचार करायला लागलो आहोत पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करायला लागलो आहोत. त्याच बरोबर देशाच्या चारही कोपर्‍यात तयार केल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची केवळ माहितीच नव्हे तर ते पदार्थ तयार करण्याची कृतीसुध्दा आपल्याला माहीत झाली आहे. त्यामुळे आपल्या जेवणाची थाळी किंवा उपहाराची डीश अनेक पदार्थांनी सजायला लागली आहे. मात्र अशी विविधता साधतानाच आपण चवीला प्राधान्य देत असल्यामुळे पौष्टिकतेला दुय्यम स्थान मिळत आहे.

त्याचा परिणाम होऊन आपल्या अन्नातील प्रथिनांचे प्रमाण घटत आहे. आपण दररोज भाजी-भाकरी खाण्याऐवजी पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी असे जंकफूड अधिक सेवन करायला लागलो आहोत. अशा पदार्थांची चव छान असते. सहकुटुंब घराबाहेर जाऊन त्यांची चव चाखण्याचा आनंदही लुटता येतो परंतु या पदार्थांमध्ये प्रथिने कमी असल्यामुळे भारताच्या शहरी भागातील लोकांच्या अन्नात ७३ टक्के पदार्थ हे प्रथिनांची तूट दाखवणारे आहेत. त्याचा सर्वसाधारण आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. परंतु असे पदार्थ खाणार्‍या लोकांपैकी ९३ टक्के लोकांना आपल्या अन्नातील हे बदल आरोग्यास घातक आहेत याचे ज्ञानही नाही आणि ज्ञान असले तर भान नाही.

त्यांना त्याचे ज्ञान किंवा भान नसले तरी या अन्नपदार्थांचे होणारे परिणाम काही चुकत नाहीत. प्रथिने कमी मिळाल्यामुळे सातत्याने थकवा आणि अशक्तपणा जाणवायला लागला आहे. या संबंधात एका संस्थेने ६ शहरांमध्ये सर्वेक्षण केले आणि त्यात ही गोष्ट आढळली. त्यातून काही सूत्रे हाती येत आहेत. ती सूत्रे लक्षात ठेवल्यास खाण्याची हौस भागूनसुध्दा प्रथिनांचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. भाजी आणायला गेल्यानंतर मटकीची उसळ जरूर आणावी. अधूनमधून शहाळे प्यावे. शेवग्याच्या शेंगा जरुर खाव्यात आणि विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारात आवर्जुन समाविष्ट होतील याबाबत दक्ष रहावे. आठवड्यातून निदान एक दिवस तरी बाजारात उपलब्ध असलेले हंगामी फळ आवर्जुन सेवन करावे. असे केल्यास प्रथिनांचा पुरवठा समाधानकारक होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment