वजन कमी करण्यासाठी……


आपले वजन आटोक्यात यावे असे न वाटणारा कोणी या जगात असेल असे वाटत नाही. सर्वांचीच धडपड वजन कमी करण्यासाठी चाललेली आहे. यासाठी काही टिप्स देणे गरजेचे आहे. या टिप्स सोप्या आहेत. या टिप्स हा काही लोकांचे अनुभव आहेत आणि त्यांनी त्यांचा अवलंब करून आपले वजन कमी करण्यात यश मिळवलेले आहे. काही महिलांना व्यायाम करण्याची इच्छा असते पण काही ना काही अडचणी येत राहतात आणि व्यायामाला सुटी द्यावी लागते. म्हणून एका गृहिणीने अशी सूचना केली आहे की, आपली मुले जोपर्यंत झोपलेली आहेत तोपर्यंतच व्यायाम उरकला पाहिजे. एकदा मुले उठली की मग आपल्यामागे व्याप लागतात आणि व्यायामाला सुटी मिळते.

एका गृहिणीने वजन कमी करण्याचा अजून एक फॉर्म्युला सांगितला आहे. ती बाकीची फार पथ्ये पाळत नाही पण एका दिवसात आपण जे काही खातो ते केवळ दोन चमचे तेलातच तयार होईल अशी दक्षता ती घेते. एका यशस्वी महिलेने म्हटलेले आहे की, वजन कमी करणे हे एका रात्रीत शक्य होत नाही. सातत्याने अनेक दिवस त्यावर चिकाटीने आणि विशेषत: शिस्तीत प्रयत्न करावे लागतात. एका आठवड्यात आणि महिन्यात वजन कमी करून देण्याचे आश्‍वासन देणारांवर विश्‍वास ठेवू नका. उपशी राहणे किंवा जेवळ टाळणे हाही वजन कमी करण्याचा मार्ग नाही. दर दोन तासांंनी थोडे थोडे खाल्ले पाहिजे. त्यात ताक, शहाळे, मूठभर सुकामेवा (त्यात काजू नकोत), फुटाणे आणि थोडे फळ यांचा समावेश असावा.

दुसर्‍या एका यशस्वी माणसाने दिलेल्या सल्ल्यानुसार आपले रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यांच्यात किमात तीन तासांचे अंतर असावे. एवढी एक गोष्ट पाळायला लागलो की वजन कमी करण्यासाठीच्या इतर अनेक पथ्यांंचे पालन आपोआपच व्हायला लागते. वजन कमी करण्यासाठी जिमला गेलेच पाहिजे असे नाही आणि कसले तरी सप्लिमेंटरी डायट घेण्याची आवश्यकता आहेच असे काही नाही. वजन कमी करणे ही काही मोहिम असता कामा नये. कमी वजन ही एक लाईफ स्टाईल आहे. ती आपण जगली पाहिजे. वजन कमी करणे हा आहार आणि विहाराचा विषय आहे. जगण्याची शैली बदलली की वजन वाढते आणि ती सुधारली की वजन कमी होते. एकदा वाढलेले वजन काही उपायांनी कमी झालेच तर त्यानंतर आपल्याला हे कमी वजन सांभाळावे लागते त्यासाठी जीवन पद्धती बदलावी लागेल. अन्यथा कमी झालेले वजन भराभर वाढत जायला लागेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment