गार्डनिंग करा आणि रहा तणावमुक्त!


छानसे घर आणि त्या घराभोवतालची सुंदर बाग..असे दृश्य प्रत्येकाला हवेहवेसे असते. मात्र ही सुंदर बाग फुलवायला पुष्कळ मेहनतही घ्यावी लागते. आता मानसशास्त्रज्ञांच्या शोधांमधून हे सिद्ध झाले आहे की गार्डनिंग थेरपी, किंवा बागकाम हा एक उत्तम शारीरिक व्यायाम तर आहेच, पण त्या शिवाय बागकामाचा छंद जोपासणाऱ्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. विशेषकरून बागकाम हे जर परिवारातील सदस्यांनी किंवा सोसायटीमधील अनेक लोकांनी एकत्र येऊन केले तर बागकाम करण्याचा आनंद तर मिळेलच, पण त्याशिवाय आपल्या घराभोवातालचा परिसरही सुंदर राहील आणि ताज्या भाज्या, फळे, फुले ही मिळतील.

गार्डनिंग थेरपी म्हणजे नक्की काय? तर बागकाम करत असताना आपल्या मनावरील तणाव कसा कमी करता येईल हे पाहणे. लंडन मधील मानसोपचारतज्ञ त्यांच्या पेशंट्सना मानसिक ताण कमी करण्यासाठी बागकाम करण्याचा सल्ला देत आहेत. त्यासाठी सर्व पेशंट्सनी दिवसातला काही वेळ बागकामासाठी देणे बंधनकारक केले गेले आहे. ह्या थेरपीचा फायदा घेणारे पेशंट्स बहुतांशी वयस्क आहेत. त्यांना संधिवात, दमा, डायबेटीस यांसारखे आजार ही आहेत. शिवाय वयस्क असल्यामुळे, त्यांची मुले त्यांच्यापासून वेगळी राहत असल्यामुळे, किंवा त्यांच्या जोडीदाराचे निधन झाल्यामुळे ते अतिशय एकाकी ही पडलेले आहेत. या एकाकीपणामुळे त्यांच्या मनावर सतत एक प्रकारचा ताण असतो किंवा ते सतत उदास मनस्थितीत असतात. त्यामुळे या लोकांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी अशी काही तरी योजना करणे गरजेचे होते, ज्यामुळे त्यांना शारीरिक व्यायाम ही मिळेल आणि कामामध्ये गुंतून राहिल्याने त्यांची उदास मनस्थितीही दूर होईल. ते उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन गार्डन थेरपी चा उपाय शोधून काढण्यात आला.

आपल्यासाठी गार्डनिंग थेरपी चांगली कशी ? तर, सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बागकाम करताना मातीमध्ये हात घालावे लागतात. मातीमध्ये अशी काही नैसर्गिक तत्वे आहेत की ज्यांच्यामुळे डिप्रेशन कमी होण्यास मदत होते. लंडनमधील शास्त्रज्ञांनी ह्या थियरी ला आधार देण्यासाठी उंदरांवर काही प्रयोग करून पहिले, तेव्हा त्यांना असे आढळले की मातीमध्ये असलेले ‘फ्रेंडली’ bacteria ( mycobacterium), anti depressant चे काम करतात. त्यामुळे मातीत हात घातल्यानंतर हे bacteria आपल्या संपर्कात येऊन डिप्रेशन कमी करण्यास मदत करतात.

बागकाम केल्यामुळे लोकांच्या स्ट्रेस लेव्हल्स कमी होताना पहिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर लोकांची मने चिंतामुक्त होऊन, काम करण्यातली त्यांची रुची आणि क्षमताही वाढीला लागलेल्या पहिल्या गेल्या आहेत. ज्यांना निद्रानाशाचा विकार होता, तो नाहीसा होऊन त्या पेशंट्सना शांत झोप लागत असल्याचे ही गार्डन थेरपी चा फायदा घेत असणाऱ्यांचे मत आहे. बागकाम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला चालना मिळून, त्याच त्याच उदास गोष्टींचा विचार करण्याची त्यांची सवय नाहीशी होताना पाहिली जात आहे. बागकाम हा असा छंद आहे जो आपल्याला थेट आपल्या मातीशी जोडतो. त्यामुळे बागकामातून आपल्याला आनंद मिळणे स्वाभाविक आहे. मातीमध्ये काम करणे, झाडे, रोपे लावणे, त्यांची मशागत करणे आणि त्यांना वाढताना पाहणे किती समाधान देऊन जारे असते..!

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment