ड जीवनसत्त्वाचा अभाव धोकादायक


आपल्या शरीराला सर्वाधिक आवश्यक असलेले जीवनसत्त्व म्हणजे अ आणि ड. ही दोन जीवनसत्त्वे नसल्यास आपल्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतात. ड जीवनसत्त्व हे सूर्यप्रकाशामध्ये विपुल प्रमाणात असते. आपला देश विषववृत्तावर वसलेला आहे आणि आपल्याला ड जीवनसत्त्व सहजपणे विनामूल्य मिळत असते. पण असे असूनही निसर्गाने आपल्याला दिलेले फुकटचे जीवनसत्त्व आपण घेतही नाही आणि त्याच्या अभावात अनेक धोक्यांना तोंड देतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावी आपल्या जीवनामध्ये अनेक दोष निर्माण होतात. ते समजून घेतल्यास आपल्याला ड जीवनसत्त्व का आवश्यक आहे हे लक्षात येईल. आपले शरीर हाडांवर उभे असते आणि हाडे मजबूत असण्यावर आपल्या शरीराची तंदुरूस्ती अवलंबून असते.

मात्र आपण ड जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा शरीराला केला नाही तर हाडे मजबूत राहत नाहीत. ती ठिसूळ होतात आणि थोड्याशाही लहानशा अपघाताने त्यांना फ्रॅक्चर होते. विशेष करून वृध्द वयामध्ये हा परिणाम फार तीव्रतेने जाणवतो. बरेच वृध्द लोक घराच्या बाथरूममध्ये घसरून पडतात आणि त्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले की कायमचे अपंग होऊन बसतात. अशा लोकांनी हाडे मजबूत व्हावीत यासाठी कष्ट घेतले असते आणि ड जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला केला असता तर त्यांच्यावर अशी पाळीच आली नसती, असे लक्षात येते. ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्नायूंचे दुखणेही जडते. विशेषतः सतत थकल्याची जाणीव होणे हे ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळेच घडत असते. कसलाही आजार नसताना अशक्तपणा जाणवणे हे ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळेच घडते.

ड जीवनसत्त्वाची कमतरता लहान मुलांनाही जाणवते. ती सतत मरगळलेली आढळतात. एवढे महत्त्वाचे हे जीवनसत्त्व मिळवणे मात्र तेवढे अवघड नाही. आपल्या खाण्यातल्या अनेक पदार्थांमध्ये ड जीवनसत्त्व मुबलकपणे असते. मात्र जाणीवपूर्वक हे जीवनसत्त्व असणारे अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोक शाकाहारी आहेत. त्यामुळे अंडी, मासे त्यांना वर्ज्य असतात. मात्र योगायोगाने अंड्यात आणि माशात ड जीवनसत्त्व मुबलक असते. याचा अर्थ अंडी आणि मासे खाल्ली नाहीत तर ड जीवनसत्त्व मिळत नाही असा नव्हे. परंतु अंडी आणि मासे न खाणार्‍यांनी ड जीवनसत्त्वाचा अंतर्भाव असणारे दुधासारखे पदार्थ जाणीवपूर्व जास्त सेवन केले पाहिजेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment