ध्यानधारणा किंवा मेडीटेशन कसे करावे..


ध्यानधारणा किंवा मेडीटेशन हे मानसिक तणाव कमी करण्यासाठीचे अतिशय प्रभावी मध्यम आहे. त्याचबरोबर ध्यानधारणेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, बारीकसारीक दुखणी, आजार कमी होऊन शांत झोप लागते आणि मनाची शांती आणि प्रसन्नता कायम ठेवण्यास मदत मिळते. मेडीटेशनला सुरुवात करताना जेव्हा चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न आपण करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते की आपले मन असंख्य विचारांनी व्यापून गेलेले आहे. अश्या वेळी चित्त एकाग्र करणे जरा कठीणच होऊन जाते. पण जसजसा सराव वाढत जातो तसतसे आपल्या विचारांवर ताबा मिळवणे शक्य होत जाते. ध्यानधारणा नियमितपणे अंगीकारण्याकरिता काही सवयी आत्मसात करणे अगत्याचे ठरते.

मेडीटेशन करिता दररोज काही वेळ बाजूला अवश्य काढावा. नियमित केल्या गेलेल्या मेडीटेशन चे चांगले परिणाम लवकरच दिसू लागतात.
ध्यानधारणा करताना श्वासोछ्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे चित्त एकाग्र करण्यास मदत मिळेल. मनामध्ये विचार जितक्या सहजतेने येतात तितक्याच सहजतेने ते काढूनही टाकता येतात हे आपल्या लक्षात येईल.

मेडीटेशन साठी घरामधील एखादी शांत जागा निवडावी. उदबत्तीचा सुवास आणि मंद वाद्यसंगीताची जोड मिळाल्यास चित्त एकाग्र करण्यास मदत मिळेल. मेडीटेशन करताना शक्यतो टीव्ही किंवा मोबाईल फोन बंद ठेवावेत.

ध्यानधारणेपूर्वी हलका व्यायाम केल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुधारून शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो. मेडीटेशन करताना पाठीचा कणा ताठ असावा. ध्यानधारणे आधी खूप जास्त आहार घेऊ नये. शक्यतो जेवणाआधी मेडीटेशन करावे. फार जास्त भूक लागली असल्यास हलका नाश्ता करावा आणि त्यानंतर थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे मेडीटेशन करावे.

मेडीटेशन साठी शक्यतो सकाळचा वेळ राखून ठेवेवा. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न होईलच,पण त्याच बरोबर संपूर्ण दिवसही चांगला जाण्यास मदत होईल.

Leave a Comment