आता एटीएम मधून मिळणार रेशन गहू, तांदूळ

एटीएम मधून नोटा काढण्याचा अनुभव बहुतेक सर्वांच्या खात्यात जमा आहे. पण आता रेशन धारकांना गहू तांदूळ सुद्धा एटीएम मधून मिळणार असून त्याची सुरवात ओरिसा सरकार करत आहे. रेशन डेपोवर ही एटीएम बसविली जाणार असून त्याला ग्रेन एटीएम असे म्हटले जात आहे. रेशन कार्ड धारकाला आपला आधार नंबर आणि रेशनकार्ड वरचा नंबर फीड केला कि एटीएम मधून योग्य धान्य मिळणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग भुवनेश्वर येथे केला जात आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अतनू सब्यसाची यांनी मंगळवारी या योजनेची घोषणा केली आहे आणि त्या संबंधी विधानसभेत माहिती दिली आहे.

ही धान्य एटीएम प्रथम शहरी भागात आणि टप्प्याटप्प्याने सर्व ग्रामीण भागात लावली जाणार आहेत. रेशन कार्ड धारकाला त्यासाठी विशेष कोड असलेले कार्ड दिले जाणार आहे. सर्व एटीएम टच स्क्रीन सह आहेत. बायोमेट्रिक सुविधाही मिळणार आहे. देशातले पहिले ग्रेन एटीएम हरियाना च्या गुरुग्राम मध्ये लावले गेले आहे. विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत सरकारने या मशीनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनला ऑटोमेटेड मल्टीकमोडीटी ग्रेन डीस्पेन्सिंग मशीन असेही म्हटले जाते.