देशात येथे आहे शकुनीमामा मंदिर
भारत हा देवळांचा देश मानला जोतो. हिंदू धर्मात तर ३३ कोटी देव आहेत असे मानले जाते. त्यातील बहुतेक देवांची मंदिरे कुठे ना कुठे आहेत. देवच काय पण भारतात राक्षस सुद्धा पूजले जातात. रावणाचे मंदिर राजस्थानात असून तेथे दसरा साजरा करताना रावण दहन केले जात नाही. महाभारताच्या युद्धाला कारण झालेला दुर्योधनाचा मामा शकुनी दुष्ट मानला जातो. पण या शकुनीचे एक मंदिर द. भारतात कोल्लम येथे आहे. येथे शकुनीची पूर्ण विधीसह पूजा केली जाते आणि पूजा करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असेही सांगितले जाते.
अर्थात दक्षिण भारतीय मंदिर शैली प्रमाणे हे मंदिर भव्य नाही तर एका झाडाखाली हे मंदिर आहे. मायम्कोडू मलंचावरु मळनाड या नावाने हे मंदिर ओळखले जाते. या मंदिराची कहाणी आहे. असे सांगतात, जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा शकुनी फार दुःखी झाला. ज्या कारणासाठी युद्ध केले तो दुर्योधन राजा झाला नाहीच पण त्याचा मृत्यू झाला. हजारो जीव गेले, हजारो साम्राज्ये देशोधडीला लागली. तेव्हा पश्चाताप होऊन शकुनीने महादेवाची तपस्या सुरु केली. त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शिवाने त्याला दर्शन दिले.
ज्या ठिकाणी, एका खडकावर शकुनीने तपस्या केली तेथे नंतर मंदिर बांधले गेले. शकुनीच्या तपस्येने पावन झालेल्या या खडकाला पवित्रेश्वरम या नावाने मान्यता दिली गेली. येथे देशभरातून भाविक पूजेसाठी येतात. दरवर्षी मालक्कूडा महोत्सव आयोजित केला जातो. येथे शकुनी मामा बरोबरच देवी, नाग, किरात मूर्ती पूजा केली जाते. तिरुवनंतपुरम पासून ६५ किमी अंतरावर हे स्थान आहे.