आपल्या आहारामध्ये सत्तूचे फायदे


भाजलेल्या चण्याचे, किंवा ज्याला आपण डाळे/ फुटाणे म्हणतो त्याचे पीठ म्हणजे सत्तू. आपल्या आहारामध्ये सत्तूचा समावेश आपण केला तर तो आपल्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरू शकतो. सत्तूचे पीठ अगदी कडक उन्हाळा जिथे जाणवतो अश्या प्रदेशांमध्ये जास्त वापरले जाते. दिवसाची सुरुवात करताना सकाळच्या न्याहारीमध्ये सत्तू घेतल्यास त्यामध्ये असलेली पोषक तत्वे शरीराला दिवसभराच्या कामांसाठी भरपूर ताकद देतात.

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचे ही तापमान वाढलेले असते.सतत तहान लागल्याची भावना होत असते आणि कितीही पाणी प्यायले तरी तहान शमल्याचे समाधान मिळत नाही. अश्या वेळी सत्तू पाण्यात कालवून त्याचे केलेले सरबत आपण घेतल्यास शरीरामधील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर सतत तहान लागत असल्यासही सत्तूचे सरबत घ्यावे. सत्तू चे सरबत तयार करण्यासाठी दोन लहान चमचे सत्तूचे पीठ घेऊन त्यामध्ये दीड कप थंड पाणी घालावे. त्यांनतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडीशी जिऱ्याची पूड घालावी आणि हे सरबत प्यावे.

सत्तूचे पीठ हे त्यामध्ये असलेले धान्य कोरडे भाजून तयार केले जाते.त्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्वे निघून न जाता त्यामध्येच राहतात. सत्तू च्या पीठामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह, मँगनीझ, आणि मॅग्नेशिम ची मात्र भरपूर प्रमाणात असते. १०० ग्रॅम सत्तू मध्ये २०.६ टक्के प्रथिने, ७.२ टक्के फॅट, १.३५ टक्के फायबर आणि एकूण चारशे सहा कॅलरीज असतात.

सत्तू हे पचनशक्ती-वर्धक आहे. यामध्ये फायबर ची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे सत्तूचे पीठ अपचन, अॅसिडीटी हे विकार टाळण्यासाठी चांगले. तसेच सत्तू वापरून तयार केलेला फेस पॅक लावल्याने त्वचेला आर्द्रता मिळून त्वचा चमकदार आणि नितळ बनविते. केसांच्या आरोग्याकरिता ही सत्तू अतिशय चांगले आहे. सत्तू मधील पोषकद्रव्ये केसांच्या मुळांना मजबूत बनवून केस गळणे थांबवितात. सत्तू मध्ये असलेल्या लोहा मुळे दिवसभर काम करण्याशी शक्ती अंगामध्ये राहते.

सत्तू हे low glycemic index असलेले खाद्य आहे. असे सांगितले जाते की सत्तूचे थंड सरबत घेतल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. तसेच कोलेस्टेरोल जास्त असणाऱ्यांनी सुद्धा सत्तूचे सेवन अवश्य करावयास हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment