बैठे काम करणार्‍यांची ऍसिडीटी


बैठे काम करणार्‍यांची सवय आणि गरज असणार्‍यांना अनेक समस्या त्रस्त करत असतात. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे ऍसिडीटी अर्थात पित्त वाढणे. पित्त वाढणे या लोकांसाठी अपरिहार्य असते. परंतु काही पथ्ये पाळल्यास त्यांना पित्त टाळता येते. त्यासाठी खालील गोष्टी कराव्यात.

चहा आणि कॉफी टाळणे – एका जागी बसून कामे करणारे लोक त्यांना भेटायला येणार्‍या प्रत्येकाबरोबर उपचाराचा आणि पाहुणचाराचा एक भाग म्हणून चहा किंवा कॉफी पितातच. त्यातली कॉफी ही पित्तास अधिक कारणीभूत ठरते आणि चहा हासुध्दा पित्त वाढवतो. अशा प्रकारे चहा आणि कॉफी घेणार्‍यांनी आपण किती कप रिचवत आहोत याचे भान ठेवावे. अनेक लोक आपल्या कामाच्या वेळेत आठ ते दहा कप चहा-कॉफी घेतात.

अशा लोकांनी आपण किती चहा घेत आहोत याची मोजदाद करावी आणि वरचेवर त्यात कपात करावी. अपरिहार्य असेल तरच चहा-कॉफी घ्यावी. समोरच्या व्यक्तीला चहा दिला म्हणजे आपणही चहा घेतलाच पाहिजे असे काही नाही. त्यातल्या त्यात तो घ्यावाच लागला तर चहा आणून देणार्‍या आपल्या शिपायाला कायमची सूचना करावी. भेटायला आलेल्या व्यक्तीला कपभरून चहा दिला तरी आपल्याला मात्र अर्धा किंवा त्यापेक्षाही कमी कप चहा द्यावा असे त्याला सांगून ठेवावे. या सवयीमुळे चहा पिण्याचे प्रमाण निम्म्याने कमी होते. बैठे काम करण्यामुळे ऍसिडीटी वाढणार्‍या लोकांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे त्यांनी ब्रेकफास्ट टाळू नये. शिवाय भूक लागल्यानंतर पोटात काहीतरी अन्न टाकावेच. ते न टाकल्यास पित्त वाढते.

मद्यपान टाळणे – काही काही लोकांना नित्य थोडे फार मद्यपान करण्याची सवय असते. तर काही लोकांना वीक एंडला मद्यपानाचा समावेश असणारी पार्टी करण्याची सवय असते. अशा लोकांनी पार्टीमध्ये अल्कोहोलचे अधिक प्रमाण असणारे मद्य आवर्जुन टाळावे. दोन जेवणाच्यामध्ये फार मोठे अंतर असू नये. सकाळी ९ वाजता काहीतरी खाल्ल्यानंतर एकदम ३ वाजता जेवण करण्याची सवय काही लोकांना असते. अशा लोकांना वास्तविक पाहता १२ ते १ च्या दरम्यान भूक लागते मात्र ते भूक लांबवतात. त्यामुळे पित्त वाढते. पित्त वाढू नये यासाठी तळलेले पदार्थ खावू नयेत आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. जेवण झाल्यानंतर एका जागी बसू नये आणि कामालाही सुरूवात करू नये. जेवणानंतर चार पावले का होईना चालावीत. शिवाय आपण आपल्या खुर्चीमध्ये कसे बसतो यावर लक्ष ठेवावे. त्यावरही अन्नपचन होणे अवलंबून असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment