मुंबईकरांचा कपडे सुकवण्याचा अप्रतिम जुगाड, व्हायरल झाला व्हिडिओ


मुंबई – मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनशी संबंधित व्हिडीओज इंटरनेटवर व्हायरल होत असतात. नुकताच मुंबई लोकलच्या डब्यात कपडे सुकवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना आवडला आहे. दादरमुंबईकर या हँडलने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हायरल झाला मुंबई लोकलमध्ये कपडे सुकवतानाचा व्हिडिओ
मुंबईतील लोकांना गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे, या दरम्यान सूर्यप्रकाश नसणे आणि हवेतील उच्च आर्द्रता यामुळे लोकांना कपडे सुकवणे कठीण होत आहे. पण हा व्हायरल व्हिडीओ पाहता यावरही अखेर मुंबईकरांनी उपाय शोधल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता, “हे फक्त आमच्या मुंबईतच घडू शकते” असे कॅप्शन दिले होते. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही.


मुंबईत दरवर्षी मान्सूनसोबत मुसळधार पाऊस पडत असताना, वेगाने धावणाऱ्या लोकल ट्रेनच्या पंख्याखाली कपडे सुकवणे ही काही नवीन गोष्ट नाही. एका जुन्या ट्विटमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ओल्या कपड्यांचे लटकलेले फोटो देखील पाहिले आहेत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत सतत पाऊस पडत असून, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेन सेवेवरही अनेकदा परिणाम झाला, तर मुंबईच्या बेस्ट बससेवेलाही अनेक भागात पाणी साचल्याने त्याचा फटका बसला.

हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या अंदाजात मुंबईत 19 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या काळात अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, 1 जून ते 14 जुलै दरम्यान पावसाशी संबंधित घटनांमध्ये महाराष्ट्रात 102 लोकांचा मृत्यू झाला आहे.