धोनीच्या सहकारी खेळाडूचा T20 मध्ये धमाका, फक्त 19 चेंडूत झळकवले शतक


नवी दिल्ली – खराब फॉर्ममुळे मुरली विजय आयपीएलच्या मागील 2 हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. गेल्या 5 मोसमात त्याला फक्त 6 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज या चॅम्पियन संघाचा भाग असला तरी या 38 वर्षीय सलामीवीर फलंदाजाने तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या सामन्यात शतक झळकावले. यादरम्यान त्याने 12 षटकार आणि 7 चौकार मारले. म्हणजेच अवघ्या 19 चेंडूत 100 धावा केल्या. मात्र, या सामन्यात त्यांच्या संघाचा पराभव झाला.

तामिळनाडू प्रीमियर लीगच्या 19 व्या सामन्यात नेल्लई रॉयल किंग्जला नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी 29 धावांत 2 गडी गमावले. यानंतर बाबा अपराजित आणि संजय यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या 230 धावांच्या पुढे नेली. संघाने निर्धारित 20 षटकात 2 बाद 236 धावा केल्या. 48 चेंडूत 92 धावा करून नाबाद राहिला. त्याने 5 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचवेळी, संजयने 55 चेंडूत 103 धावा करत शेवटपर्यंत तग धरला. 6 चौकार आणि 9 षटकार मारले.

विजयने केल्या संघाच्या अर्ध्याहून अधिक धावा
प्रत्युत्तरादाखल राबी वॉरियर्स संघ एकीकडून विकेट्स गमावत राहिला, पण मुरली विजय खंबीर राहिला. त्याने 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेवटी 66 चेंडूत 121 धावा करून तो बाद झाला. संघाला निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 170 धावा करता आल्या. मुरली विजयशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. त्याने संघाच्या अर्ध्याहून अधिक धावा केल्या.

आयपीएलमध्ये झळकावली आहेत 2 शतके
मुरली विजयचा आयपीएल रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतकांच्या मदतीने 2500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 106 सामन्यात 26 च्या सरासरीने 2619 धावा केल्या आहेत. 127 धावांची सर्वोत्तम खेळी. गेल्या 2 मोसमात त्याला संधी मिळाली नाही. 2020 मध्ये 3, 2019 मध्ये 2 आणि 2018 मध्ये एक सामना तो खेळला होता. यापूर्वी 2017 मध्ये त्याला 14 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.