शिंदे मंत्रिमंडळात मनसेचा समावेश? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादर येथील खाजगी निवासस्थानी दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दोघांमध्ये झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांचा पक्ष मनसेचा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. राज ठाकरे यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी फडणवीस त्यांच्या घरी पोहोचल्याचे बोलले जात आहे. खरे तर ठाकरे यांच्यावर काही काळापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.

याआधीही महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे यांनी फोन केल्याचे सांगण्यात आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे सातत्याने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. एकनाथ शिंदे यांनीही हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला.