करोनाचा दणका- चीनच्या कॅसिनो नगरीतील सर्व कॅसिनो बंद
आशियातील लास वेगास अशी ओळख असलेली चीनची कॅसिनो नगरी मकाऊ मध्ये दोन वर्षानंतर प्रथमच सर्व कॅसिनो बंद केले गेले आहेत. येथे करोनाचे संक्रमण वेगाने होऊ लागल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. जगातील मोठ्या गँम्बलिंग हब मध्ये मकाऊचा समावेश होतो. येथील कॅसिनो बंद झाल्याने गेमिंग कंपन्यांचे शेअर झपाट्याने घसरले आहेत. करोना संक्रमण वाढल्याने येथील ३० पेक्षा अधिक कॅसिनो आणि अन्य व्यवसाय १ आठवड्यासाठी बंद केले गेले आहेत.
येथील नागरिकांना सुद्धा घरात कैद होण्याची पाळी आली असून शहरभर कडक लॉकडाऊन लावला गेला आहे. अमेरिकन कॅसिनो रिसोर्ट कंपनी, लास वेगास सँडसचे मकाऊ येथे मुख्यालय आहे. त्यांची सबसिडी कंपनी सँडस चायनाचे शेअर या बंदी मुळे ९ टक्के घटले असल्याने त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
जूनच्या मध्यापर्यंत शहरात १५०० करोना केसेस असून १९ हजार लोकांना क्वारंटाइन केले गेले आहे. चीन सरकारच्या झिरो टोलरन्स नीती मुळे तसेही गेले तीन आठवडे मुख्य कॅसिनो जवळजवळ बंद आहेत. कारण अगदी कमी स्टाफ आणि मर्यादित ग्राहकच येथे येऊ शकत आहेत. परिणामी गुंतवणूकदरांचा विश्वास डळमळू लागला आहे आणि अनेकांनी गुंतवणूकीतील पैसा काढून घेण्यास सुरवात केल्याचे सांगितले जात आहे. मकाऊच्या ३० भागात कडक लॉकडाऊन आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये १५ दिवस कॅसिनो बंद होते. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आहेत त्यांना याची झळ बसली आहे.