जगभरात मनोरंजन उद्योगाची उलाढाल १.६० हजार कोटी

जगात आज सर्व देशात मनोरंजन उद्योग भरभराटीला येत आहे. ब्रिटन मध्ये १८८८ मध्ये पहिले चलचित्र तयार झाले ते फक्त २.११ सेकंदाचे होते आणि फ्रांसचे वैज्ञानिक लुईस प्रिन्स यांनी ते बनविले होते. आज या उद्योगात वर्षाला पाच लाखापेक्षा जास्त चित्रपट बनतात आणि भारताचा विचार केला तर येथे वर्षात सरासरी २४०० पूर्ण लांबीचे चित्रपट तयार होतात. यातून होणारी आर्थिक उलाढाल जगाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे याची अनेकांना माहिती नाही.

करोना काळात अन्य अनेक उद्योगव्यवसायाप्रमाणेच मनोरंजन उद्योगाला सुद्धा फटका बसला आहे. २०२१ ची आकडेवारी सांगते की या वर्षात या व्यवसायात २१४ अब्ज डॉलर्स म्हणजे १.६० हजार कोटींची उलाढाल झाली. २०१९ मध्ये म्हणजे करोना पूर्वी हीच उलाढाल ३ लाख ३३ हजार कोटी होती.

भारतात चित्रपट मोठया संखेने बनतात हे खरे असले तरी या उद्योगात उलाढालीच्या बाबतीत मात्र चीन जगात आघाडीवर आहे. चीन मध्ये या उद्योगाची उलाढाल ५६ हजार कोटींची असून पहिल्या टॉप १० देशात भारत ८ व्या स्थानावर आहे. चीन मध्ये वर्षात ८५० चित्रपट बनले आणि त्यातून देशांतर्गत कमाई ६० टक्के तर ४० टक्के कमाई परदेशातून झाली. याउलट भारतात वर्षात २४०० चित्रपट बनले आणि त्यातून ३८०० कोटींची उलाढाल झाली आहे. या यादीत दोन नंबरवर युएसए असून येथे वर्षात ८०० चित्रपट बनले आणि त्यातून ३५ हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तीन नंबरवर जपान आहे. येथे वर्षात ८५० चित्रपट बनले आणि त्यातून ११ हजार कोटींची उलाढाल झाली आहे.

या यादीत भारताच्या अगोदर द. कोरिया, रशिया, फ्रांस आणि युके व आयर्लंड या देशांचा नंबर आहे तर भारताच्या नंतर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे देश आहेत. भारतात झालेल्या उलाढालीत ८५ टक्के कमाई स्थानिक तर १५ टक्के कमाई विदेशातून झाली आहे.