राजकारणात येणार नाही – अक्षयकुमार

बॉलीवूड खिलाडी नावाने प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार त्याचे चित्रपट, विविध वेगळी मते, त्याचे परदेशी नागरिकत्व यामुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा अनेक मुलाखतीत तो विविध प्रश्नांना उत्तरेही देतो. असेच एका मुलाखतीत त्याला राजकारणात येणार काय असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने समाजासाठी जे करता येईल ते सर्व जरूर करेन पण राजकारणात जाणार नाही असे उत्तर दिले. लंडनच्या पॉल मॉल इन्स्टीटयूट ऑफ डायरेक्टर आयोजित हिंदुजा व बॉलीवूड पुस्तक प्रकाशनाच्या वेळी हि मुलाखत झाली.

५४ वर्षीय अक्षय कुमार राजकारण प्रवेशाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, चित्रपटात मी खुश आहे. अभिनेता म्हणून सामाजिक प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलो आहे. आत्तापर्यंत मी १५० चित्रपट प्रोड्यूस केले आहेत त्यातील अनेक सामाजिक विषयांवर आहेत. पण मला आनंदात राहायचे आहे, चित्रपट क्षेत्र मला आवडते आणि देशासाठी चित्रपटाच्या माध्यमातूनच योगदान देणे हेच माझे काम आहे त्यामुळे राजकारणात जाण्याचा अजिबात विचार नाही.

१९९१ मध्ये सौदागर चित्रपटातून अक्षयकुमार ने बॉलीवूड डेब्यू केला होता मात्र त्याला प्रसिद्धी मिळाली ती १९९२ मध्ये रिलीज झालेल्या खिलाडी चित्रपटाने. त्याने १०० हून जास्त यशस्वी चित्रपट केले आहेत. त्याचा नुकताच आलेला पृथ्वीराज चौहान फ्लॉप झाला. रक्षाबंधन, सेल्फी आणि रामसेतू हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.