राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?

रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पक्ष बैठकीत एकनाथ शिंदे सरकार कधीही कोसळू शकते तेव्हा मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा असा इशारा आमदारांना दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बंडखोर नेत्यांमधील काही आमदार खातेवाटपावरून नाराज असल्याने शिंदे सरकार कदाचित याच महिन्यात सुद्धा कोसळेल असे पवार म्हणाले असल्याचे समजते. मात्र प्रत्यक्षात रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुक मतदानात राष्ट्रवादीच्या पाच आमदारांची गैरहजेरी वेगळेच संकेत देत असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे शिंदे सरकार कोसळेल या पेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटणार का याची अधिक चर्चा होऊ लागली आहे.

अध्यक्षपदाच्या महत्वाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भारणे, बबन शिंदे, निलेश लंके, दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे या आमदारांची मतदानाला गैरहजेरी होती. नबाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याने मतदान करू शकले नाहीत. गैरहजर असलेले पाच आमदार राष्ट्रावादी नेते अजित पवार यांच्या जवळचे आहेत. भारणे त्यांच्या आईचे १ जुलै रोजी निधन झाल्याने मतदानाला आले नाहीत असे सांगितले जात आहे. शिंदे खासगी ट्रीपसाठी ऑस्ट्रेलियात गेले होते. ते आणि बनसोडे मतदानाच्या ठिकाणी उशिरा आले आणि त्यामुळे त्यांनी मतदान केले नाही असा खुलासा केला गेला आहे. तर लंके ‘नॉट रिचेबल’ आहेत. याचा सरळ अर्थ राष्ट्रवादी मध्ये सर्व काही आलबेल नाही असा लावला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना विभाजनापूर्वीच राष्ट्रवादीचा एक गट भाजप सोबत जाण्याच्या तयारीत होता मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नाराजीच्या भीतीने हे संकट टळले असे समजते. आता विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा हक्क असल्याचे बोलले जात असून जयंत पाटील यांच्या नावाचा विचार केला जात आहे असेही सांगितले जात आहे.