करोनाची नवी लक्षणे ओळखा, डोकेदुखी आहे मुख्य लक्षण

करोना जगभरात पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागला असून भारतासह अमेरिका, चीन आणि युरोपात पुन्हा मोठ्या संख्येने नव्या केसेस येऊ लागल्या आहेत. भारतात गेल्या १५ दिवसात करोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. ओमिक्रोन सबव्हेरीयंट बीए.४ आणि बीए.५ चे संक्रमण अतिशय वेगाने होत आहे. यावेळी करोनाची लक्षणे गंभीर नाहीत मात्र तरीही सावधानता बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले गेले आहे.

यंदा करोनामधून बरे झाल्यावर सुद्धा दीर्घकाळ काही लक्षणे दिसत आहेत. डोकेदुखी हे त्यातील सर्वात मोठे लक्षण आहे. ६९ टक्के संक्रमितांमध्ये डोकेदुखी हेच मुख्य लक्षण आहे. करोनाचे संक्रमण झाल्यापासून डोकेदुखी सुरु होत आहे आणि बरे झाल्यावर सुद्धा काही दिवस डोकेदुखी राहते आहे. डोकेदुखी ही समस्या नेहमीच आढळणारी आहे त्यामुळे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कारण दीर्घकाळ मोबाईल पाहणे, उन्हाळा, संगणकावर बराच काळ काम करणे, अपुरी झोप, वेळी न जेवणे अश्या कारणांनी सुद्धा डोकेदुखी होते. पण ही डोकेदुखी औषध घेतल्यावर थांबते. करोना मुळे डोकेदुखी असेल तर औषध घेऊनही त्याचा त्रास राहतो. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ डोकेदुखी राहिली तर करोना चाचणी करून घ्यावी असा सल्ला दिला गेला आहे.

डोकेदुखी सह ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा खराब होणे, थकवा, सांधे दुखी, नाक वाहणे. पोट बिघडणे अशीही लक्षणे असतील तर करोना चाचणी अवश्य केली पाहिजे असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.